मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या अमाप उधळपट्टीमुळे चर्चेत आले आहेत. समाजप्रबोधन आणि कीर्तन सांगणाऱ्या या महाराजांचे वार्षिक उत्पन्न किती असेल याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे.
इंदुरीकर महाराज कर्ज काढून लग्न सोहळ्यावर खर्च करू नका, असा सल्ला देतात. पण त्यांनीच स्वतःच्या मुलीच्या म्हणजेच ज्ञानेश्वरी इंदुरीकरच्या साखरपुड्यावर अफाट खर्च केला. यावरुन सोशल मीडियात इंदुरीकर महाराज ट्रोल होत आहेत. या घडामोडीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काही जण इंदुरीकर महाराजांनी केलेल्या खर्चावर टीका करत आहेत तर काही जण इंदुरीकर महाराजांचे खर्चासाठी समर्थन करत आहेत. कर्ज काढून लग्न सोहळे करू नयेत या मताचे महाराज आहेत असे त्यांच्या समर्थानात बोलणाऱ्यांचे मत आहे. महाराजांची आर्थिक परिस्थिती ही भक्कम असल्यामुळे त्यांनी खर्च केला असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराजांचे उत्पन्न नक्की आहे तरी किती हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे.
सध्या सोशल मीडियात फिरत असलेल्या एका व्हिडिओचा आधार घेत महाराजांचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास सात कोटींच्या घरामध्ये आहे. तसेच महाराजांच्या एका किर्तनाचं मानधन जवळपास पन्नास हजारांच्या आसपास असल्याची माहिती समोर येत आहे. सतत होणाऱ्या टीकेमुळे महाराजांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.






