Wednesday, November 19, 2025

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी दिली आहे. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन पुढच्या महिन्यात, म्हणजेच डिसेंबरमध्ये धावणार असल्याची माहिती त्यांनी स्पष्ट केली आहे. वंदे भारत ट्रेनसोबतच, देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दलही त्यांनी माहिती दिली. मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान ५०८ किमी मार्गावर धावणारी देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२९ मध्ये धावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, बुलेट ट्रेनचा संपूर्ण मार्ग सुरू होण्यास वेळ असला तरी, पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होऊ शकतो. सूरत ते वापी यादरम्यान बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये धावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना लवकरच या अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येईल. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी बुलेट ट्रेन धावणार का? याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कोणतीही थेट प्रतिक्रिया देण्यात आली नाही, मात्र २०२९ मध्ये मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन निश्चित धावेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी ग्वाही

देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प २०२९ पर्यंत १०० टक्के सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या योजनेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी पहिल्या टप्प्यात सूरत ते बिलिमोरा यादरम्यान ५० किमी मार्गावर बुलेट ट्रेन धावणार होती. मात्र, आता हा टप्पा वाढवण्यात आला आहे. सुधारित योजनेनुसार, ऑगस्ट २०२७ मध्ये सूरत ते वापी या १०० किमी मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या बदलामुळे गुजरातच्या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान बुलेट ट्रेनची सेवा लवकर सुरू होईल, ज्यामुळे या भागातील प्रवासाला मोठी गती मिळेल. २०२९ पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, रेल्वेकडून या प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.

पंतप्रधान मोदी सूरत स्टेशनच्या कामावर खूश

रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमी मार्गावर बुलेट ट्रेन ३२० किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. जर बुलेट ट्रेन केवळ ४ स्थानकांवर थांबली, तर ५०८ किमीचे हे अंतर दोन तासांत (२ तास) पूर्ण होईल. जर सर्व १२ स्थानकांवर बुलेट ट्रेनला थांबा दिला, तर मुंबई-अहमदाबाद हे अंतर कापण्यासाठी २ तास १७ मिनिटांचा वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच बुलेट ट्रेनच्या सूरत स्थानकाची पाहणी केली होती. या पाहणीबद्दल बोलताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, सूरत स्थानकावरील प्रकल्पाचे काम पाहून पंतप्रधान मोदी अत्यंत खूश झाले आहेत. यातून प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता आणि वेळेवर पूर्णत्वाची खात्री मिळते. बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास केवळ गतीमान होणार नाही, तर आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांनाही नवी दिशा मिळेल.

रात्रीच्या प्रवासासाठी मिळणार आरामदायी पर्याय

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर (Sleeper) ट्रेनची सेवा कधी सुरू होईल, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, ही सेवा पुढील महिन्यापासून (डिसेंबरमध्ये) सुरू होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनच्या जागा पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी बनवण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना कमीतकमी धक्का जाणवेल, अशा पद्धतीने या ट्रेनची रचना आणि तंत्रज्ञान सुधारले गेले आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना अधिक चांगल्या आणि आरामदायी सुविधा मिळतील. आधुनिक तंत्रज्ञान आणि आरामदायी आसनव्यवस्था यांमुळे ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment