महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश
मुंबई (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालय येथे बुधवारी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरून काढावा तसेच पदोन्नतीचे विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश अडसूळ यांनी प्रशासनाला या बैठकीदरम्यान दिले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे, महानगरपालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (अतिरिक्त कार्यभार) पुरूषोत्तम माळवदे तसेच विविध विभागांचे प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.
महानगरपालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च, अनुसूचित जातींसाठी प्राप्त होणारा निधी याबाबतचा आढावा यावेळी आयोगाकडून घेण्यात आला. तसेच लाड पागे समिती, अनुकंपा तत्वावरील प्रकरणांची माहिती या बैठकीत घेण्यात आली.
स्वच्छता कामगारांसाठीच्या आश्रय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला. अनुसूचित जातीसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती आयोगाने जाणून घेतली. तसेच दलित वस्तीत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नागरी सेवासुविधांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला.






