नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली, या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील काही राजकीय घडामोडींबद्दल नाराजी व्यक्त केली आणि काही तक्रारी मांडल्या.
एकनाथ शिंदे यांनी बैठक दरम्यान हे स्पष्ट केले की, काही नेत्यांची कार्यशैली आणि स्वार्थी वागणूक युतीसाठी धोका निर्माण करत आहे. युतीतल्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टाळावे, असे त्यांनी सुचवले. शिंदे यांच्या मते, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उत्तम वातावरण निर्माण झाले आहे, पण काही नेत्यांच्या कृतीमुळे ते वातावरण खराब होऊ शकते, आणि त्यामुळे विरोधकांना फायदा होऊ शकतो.
शिंदे यांनी सांगितले की, "युतीच्या विजयाच्या घोडदौडीत काही अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत. मीडियात येणाऱ्या उलटसुलट बातम्या आणि चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होतोय. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आहे." यासाठी, शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि युतीतील इतर नेत्यांना संयमाने वागण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्र्यांनीदेखील युतीतील अंतर्गत प्रवेश टाळण्याच्या बाबतीत आपला ठाम भूमिका घेतली आहे, आणि एकत्रितपणे योग्य आणि सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.