गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल) आणि विशेषत: डीपफेक तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. एका बाजूला एआयमुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डीपफेक आणि एआय आधारित गुन्हे हे आजच्या डिजिटल युगातील एक मोठे आव्हान बनले आहे.
डीपफेक हा शब्द 'डीप लर्निंग' आणि 'फेक' या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. हे एक प्रकारचे सिंथेटिक मीडिया आहे. याचे कार्य लक्षात घेतले असता, डीपफेक तंत्रज्ञान 'जनरेटिव्ह ॲडव्हर्सेरियल नेटवर्क्स' नावाच्या एआयचा वापर करते. याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे फोटो, व्हिडीओ आणि आवाजाचे नमुने घेऊन त्याची हुबेहूब बनावट; परंतु अत्यंत वास्तववादी प्रतिमा, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार केले जातात. आपण अनेकदा राजकीय नेत्यांची भाषणे, काही उच्चपदस्त मोठ्या लोकांच्या फोटोखाली व्हिडीओमध्ये रीलमध्ये जे काही ऐकतो, पाहतो ते याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेले असते. अनेकदा अशा लोकांना समाजात बदनाम करण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी समाज माध्यमातून असे चुकीचे व्हिडीओ, ऑडिओ, रील्स व्हायरल केले जातात. सर्वसामान्य जनतेला यातील खरे- खोटे समजणे सहजासहजी शक्य होत नाही. याचा परिणाम समाजात तेढ निर्माण करणे, राजकीय समीकरण बदलणे, कोणत्याही संवेदनशील विषयाला वेगळे वळण देणे यावर होताना दिसतो. हे बनावट कंटेंट इतके खरे वाटतात, की ते मूळ आहेत की बनावट, हे ओळखणे कोणत्याही सामान्य माणसाला जवळजवळ अशक्य होते.
एआय आणि डीपफेक आधारित प्रमुख गुन्हे याचा अभ्यास केला असता, समजते की एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात आहे. त्यातील प्रमुख प्रकार म्हणजेच तोतयागिरी आणि आर्थिक फसवणूक हा होय. गुन्हेगार एआय निर्मित आवाज किंवा व्हिडीओ वापरून पीडितांच्या मित्र, कुटुंबातील सदस्य, किंवा उच्च अधिकाऱ्याची नक्कल करतात. बनावट आणीबाणी किंवा महत्त्वाच्या वायर ट्रान्सफरची मागणी करून लोकांची आर्थिक फसवणूक करतात. चेहरा किंवा आवाज ओळखण्यावर आधारित सुरक्षा प्रोटोकॉल भेदण्यासाठी डीपफेकचा वापर करून बँक खाती हॅक करणे, कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्ड उघडणे शक्य होते. खंडणी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा गुन्हेगार याचा आधार घेतात. गुन्हेगार एखाद्या व्यक्तीचे बनावट, तडजोड करणारे किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ/फोटो तयार करतात. या बनावट कंटेंटचा वापर करून पीडितांना ब्लॅकमेल केले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडले जाते. चुकीची आणि खोटी माहिती पसरवणे राजकीय नेते किंवा सार्वजनिक व्यक्ती असे काहीतरी बोलत किंवा करतानाचे डीपफेक व्हिडीओ तयार केले जातात, जे त्यांनी प्रत्यक्षात कधीच केले नसते. याचा उपयोग प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी, सामाजिक संघर्ष निर्माण करण्यासाठी किंवा निवडणुकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी केला जातो. ओळख चोरी आणि फेक प्रोफाईल्स लोकांचे ऑनलाइन उपलब्ध असलेले फोटो वापरून AI आणि डीपफेकच्या मदतीने त्यांचे फेक प्रोफाईल्स तयार करणे. या प्रोफाईलचा वापर इतरांची फसवणूक किंवा गैरवर्तन करण्यासाठी केला जातो.
या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे जाणून घेणे आजमितीला खूप आवश्यक आहे. एआय आधारित गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
सत्यापनावर भर द्या : फोनवर किंवा व्हिडीओ कॉलवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास, ताबडतोब शंका घ्या. त्यांच्याशी खाजगीरीत्या संपर्क साधून स्वतंत्रपणे माहितीची सत्यता तपासा. डीपफेक व्हिडीओंमध्ये काही विसंगती असतात, जसे की चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, प्रकाशाची दिशा किंवा आवाजाची गुणवत्ता. अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या.
वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा : सोशल मीडियावर तुमचे खूप जास्त वैयक्तिक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणे टाळा. गुन्हेगार याच डेटाचा वापर डीपफेक तयार करण्यासाठी करतात. तुमचे पासवर्ड मजबूत ठेवा आणि शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.
एआय जनरेटेड कंटेंट ओळखा : केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत, की एआयच्या मदतीने तयार केलेल्या कोणत्याही कंटेंटसोबत (व्हिडीओ, ऑडिओ, फोटो) तो 'एआय जनरेटेड' असा उल्लेख करणे आवश्यक आहे. अशा सूचना असलेल्या कंटेंटवर लगेच विश्वास ठेवू नका.
जागरूक रहा : डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांच्या नवीन पद्धतींबद्दल माहिती ठेवा.आपल्यासोबत असा कोणताही गुन्हा झाल्यास काय कराल? हे लक्षात ठेवा. ताबडतोब तक्रार करणे महत्त्वाचे आहे. सायबर गुन्ह्याची माहिती मिळाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवा. यासाठी संपर्क क्रमांक मदतीसाठी १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा. एआय तंत्रज्ञान एक शक्तिशाली साधन आहे; परंतु त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे. व्यक्तिगत स्तरावर जागरूकता आणि सतर्कता बाळगणे, तसेच कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या स्तरावर कडक नियमावली तयार करणे, हेच डीपफेक आणि एआय आधारित गुन्ह्यांचा वाढता धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
- मीनाक्षी जगदाळे