Tuesday, November 18, 2025

मृत्यू इथले संपत नाही

मृत्यू इथले संपत नाही

पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक वर्षे अपघातांसाठी ‘कुख्यात’ ठरत आहे. वाढते वाहनभार, रस्त्याची रचना, मोठ्या उताराचा ढलान आणि अवजड वाहनांचे नियंत्रण सुटणे या गोष्टींच्या संगमामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंड सुरू आहे. त्यामुळे मृत्यू इथले संपत नाहीत असेच म्हणावे लागेल.

नवले पूल परिसरात घडलेले अपघात हे एक-दोन घटनांपुरते मर्यादित नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो अपघातांची नोंद झाली असून यांपैकी अनेक अपघात गंभीर स्वरूपाचे ठरले आहेत. काही घटनांमध्ये अवजड वाहनांनी ब्रेक फेल झाल्याने गतीवर नियंत्रण सुटून अनेक वाहने चेंगरली गेली, तर काही अपघातांमध्ये दुचाकीस्वार, पादचारी आणि खासगी वाहनचालकांचे प्राण गेले. नुकताच एक अपघात झाला त्यात ८ जणांना जीव गमवावा लागला, तर २२ जण गंभीररीत्या जखमी झाले. या अपघाताच्यानिमित्ताने नवले पुलाची असुरक्षितता पुन्हा चर्चेत आली. त्यामुळे 'मृत्यू इथले संपत नाहीत' असेच म्हणावे लागेल. नवले पुलावर अपघात झाल्यावर नुसतीच उपाययोजनांची चर्चा होते, पण त्यावर कृती शून्य असते. गेल्या आठ वर्षांत नवले पूल परिसरात २१० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये ८२ पेक्षा अधिक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. यामध्ये प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. आणखी किती निष्पापांचे बळी घेणार आहात? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करताना दिसतात. नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, ठोस उपाययोजना नसल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. या होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून मुंबई-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे जातो. आतापर्यंत ८२ पेक्षा अधिक लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. रस्त्याचा तीव्र उतार आणि त्या उतारावरून खाली येताना वाहनांचे वेग आपोआप वाढतात आणि जर चालकाने काळजी घेतली नाही तर वाहनावरचे नियंत्रण सहज सुटू शकते. या भागात अनेक अवजड वाहने विशेषत: कंटेनर, ट्रक, टेलर नियमितपणे ये-जा करतात. या वाहनांमध्ये यांत्रिक बिघाड किंवा ब्रेकची क्षमता कमी असल्यास अपघाताची शक्यता वाढते. अनेकदा जड वाहनांचे चालक उतारावर येताना इंजिन बंद करणे किंवा न्यूट्रल गिअरमध्ये वाहन चालवणे पसंत करतात, ज्यामुळे वेग अनियंत्रित वाढतो. तसेच काही चालक सतत डावीकडे राहण्याचा नियम पाळत नाहीत, अचानक लेन बदलतात किंवा सिग्नलचे पालन करत नाहीत. वाहनचालकांची बेपर्वाई कारणीभूत ठरते. रस्त्याची रचना देखील समस्या वाढवणारी आहे. उतारानंतर अचानक वळण येते आणि पुढे एक महत्त्वाचा सिग्नल लागतो. त्यामुळे उतारावर वेग जास्त झाल्यास पुढे वाहन थांबवणे कठीण होते. वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरुस्ती, अपुरा प्रकाश, संकेत फलकांचा अभाव किंवा चुकीची बांधणी हेही घटक अपघातास कारणीभूत ठरतात, अशी काही कारणे आहेत, की ज्यामुळे अपघातात वाढ होताना दिसत आहे. कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान ८ कि. मी. रस्त्यावर उतार आहे. हा उतार आय. आर.सी.च्या मानकाप्रमाणे योग्य आहे. इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात व त्या भागांत सतत ब्रेकचा वापर केल्यामुळे ब्रेक निकामी होतात. त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होतात, असे एनएचएआयने म्हटले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता आणि नऱ्हे येथील महामार्गावर झालेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे निष्पापांचे बळी जात आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अपघात वाढल्यानंतर प्रशासनाने काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. उतारावर वेगमर्यादा दर्शवणारे फलक लावणे, रस्त्याचे पुनर्बांधणी करणे, अतिरिक्त सिग्नल बसवणे, पोलीस गस्त वाढवणे अशी पावले उचलण्यात आली. काही वेळा विशेष मोहिमेद्वारे अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. ब्रेक तपासणी, फिटनेस तपासणी आणि वाहतूक नियमभंगावरील कारवाईतही वाढ करण्यात आली आहे. पण, प्रशासनाची उपाययोजना बहुतेकदा तात्पुरती आणि अपुरी असते. अपघात झाल्यावर काही दिवस गदारोळ होतो आणि नंतर परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे या मार्गावरील कायमस्वरूपी रस्त्याचे डिझाइन बदलणे, उतार कमी करणे, स्वतंत्र अवजड वाहन मार्ग तयार करणे अशा दीर्घकालीन उपायांची गरज आहे. नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. जसे की, रस्त्याच्या उताराचे पुनर्मूल्यांकन आणि सुधारणा, रस्त्याचा उतार कमी करणे किंवा त्यास सुरक्षित स्वरूप देण्यासाठी तांत्रिक बदल आवश्यक आहेत. अवजड वाहनांसाठी वेगळा मार्ग असणे आवश्यक आहे. उतारावरून येणाऱ्या जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन किंवा स्वतंत्र मार्ग तयार केल्यास सुरक्षितता वाढण्यास मदत होईल. ट्रक, कंटेनर यांची निरंतर तांत्रिक तपासणी गरजेची आहे. कठोर वाहतूक नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.

नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. इथे सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही का? अजून किती निष्पाप लोकांचे जीव घेणार आहात? मरण एवढे स्वस्त झाले आहे का? असे संतप्त सवाल पुणेकर करत आहेत. नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात; परंतु अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होते. चर्चा, बैठका होतात अन् त्यानंतर पुन्हा काहीच होत नाही. प्रवासी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. त्याबरोबरीने प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गावर ‘सावधान, पुढे नवले पूल आहे’ अशा आशयाचे फलक लावले. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना सोडता प्रशासनाने कुठल्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. नवले पूल हा केवळ पुण्यातील एक वाहतुकीचा बिंदू नाही, तर गेल्या काही वर्षांतील अनेक दुर्घटनांचा केंद्रबिंदू ठरला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनी पुन्हा पुन्हा सावधगिरीची घंटा वाजवली आहे. त्यामुळे यापुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासन, नागरिक आणि वाहनचालक यांनी एकत्रितपणे पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सुरक्षितता ही केवळ कागदी घोषणा न राहता प्रत्यक्षात लागू झाल्यावरच नवले पूल परिसर भविष्यातील अपघातांच्या सावटातून मुक्त होईल.

Comments
Add Comment