Monday, November 17, 2025

पुण्यात घडतंय तरी काय? ऑनलाईन फसवणूक करत खात्यातील लाखोंची रक्कम लंपास

पुण्यात घडतंय तरी काय? ऑनलाईन फसवणूक करत खात्यातील लाखोंची रक्कम लंपास

पिंपरी : सध्या डिजिटल व्यवहारामुळे घरबसल्या बँकेची कामं सोपी झाली आहेत. मात्र या ऑनलाईन व्यवहारामुळे अनेक नागरिकांचे मोठ्या रकमेचे नुकसान झाले. ऑनलाईन व्यवहारांमुळे पुण्यात लागोपाठ दोन व्यक्तींची फसवणूक झाली आहे. ज्यात लाखो रुपयांना गंडा घालण्याचे काम ऑनलाईन हॅकर्सने केले आहे. या लागोपाठ झालेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमुळे पिंपरी शहरातील नागरिकांमध्ये ऑनलाईन व्यवहाराबद्दल असुरक्षितता निर्माण झाली आहे.

पिंपरीमध्ये एका सेवानिवृत्त व्यक्तीचा मोबाइल हॅक करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख ७९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीने पिंपरीच्या संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत भीती पसरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून त्यांची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर त्यांचा मोबाइल हॅक करून फिर्यादींचा मोबाइल नंबर लिंक असलेल्या बँक खात्यातून ७ लाख ७९ हजार रुपये काढून घेतले.

तर यापूर्वी बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे एका व्यक्तीची ७२ लाख ६४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना भोसरी येथे घडली होती. या प्रकरणात ४० वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केट आणि आयपीओसाठी फिर्यादीला एकूण ७२ लाख ६४ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवणुकीच्या रक्कमेवर दोन कोटी ४६ लाख रुपये एवढा नफा दाखवला गेला. मात्र, गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्यासाठी एकूण जमा रकमेच्या १२ टक्के शुल्काची मागणी करण्यात आली. या सापळ्यात बळी पडलेल्या फिर्यादीची ७२ लाख ६४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले.

Comments
Add Comment