Monday, November 17, 2025

मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर वाहतूक बंदी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून अधिसूचना जारी

अलिबाग (प्रतिनिधी) : मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावरील अपघात कमी होण्यासाठी तसेच स्थानिक नागरिक,विद्यार्थी व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून मांडवा जेट्टी ते अलिबाग या मार्गावर दररोज सकाळी ८ ते दु. १२ वा.पर्यंत तसेच सायं.४ ते रात्री ८वा.पर्यंत या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत जड अवजड वाहनांकरिता (दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून) जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूकबंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटक जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी, नागाव येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आपापली वाहने घेऊन येत असतात. पर्यटकांची वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मांडवा जेट्टी ते अलिबाग हा रस्ता अरुंद असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रक मातीची/खडीची वाहतूक करणारी वाहने व सिमेंट कॉन्क्रीटीकरणाकरीता सिमेंट मिक्सर, इतर सामनांची वाहतूक करणारे अवजड वाहने जात येत असतात. त्यातच मांडवा जेट्टी येथे जलप्रवासी वाहतूक बोटी तसेच रो-रो सेवा सुरु असल्याने त्यामधून देखील मुंबई येथून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे मांडवा जेट्टी हा रस्ता अरुंद असल्यामूळे वाहतूक कोंडी होऊन या मार्गावर नेहमी किरकोळ, गंभीर व प्राणांतिक अपघात होत असून, या अपघातांमध्ये वाढ होत आहे. तसेच दर शनिवार व रविवार या दिवशी मुंबई येथून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, विद्यार्थी तसेच पर्यटकांना प्रवासाकरीता जास्तीचा वेळ लागतो. तसेच आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने रुग्णाच्या जिवितास धोका संभवू शकतो. ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहन नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना लागू राहणार नाही.

Comments
Add Comment