पाकचे जनरल असीम मुनीर यांना पाकमध्ये अभूतपूर्व अधिकार देण्यात आले आहेत आणि त्यामुळे त्यांना आयुष्यभर घटनेद्वारा घटनात्मक सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे. पाकमधील २७ व्या घटनादुरुस्तीद्वारे मुनीर यांना हे अनिर्बंध अधिकार आणि कवच प्रदान करण्यात आले. हा निर्णय पाकमधील लोकशाही संपुष्टात आणणारा तर आहेच पण तेथील जी काही थोडीफार लोकशाही अस्तित्वात आहे तीही संपवण्याचा प्रयत्न आहे. देशातील सत्ता समतोल ढासळवण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो पाकमधील घटनेद्वारा करण्यात आला आहे. अध्यक्ष असिफ अली झरदारी ज्यांनी या घटनादुरुस्तीवर सही केली ते लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्याबद्दल त्यांची ख्याती नाही. झरदारी यांची ख्याती लोकशाहीच्या स्थैर्याला नख लावण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठीच आहे. पण यापेक्षा गंभीर बाब या घटनादुरुस्तीत ही आहे, की त्यामुळे संसदेच्या अधिकारांवर गदा येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरकार स्थापन करण्याबाबत जे घटनात्मक अधिकार आहेत त्यांना कात्री लावण्यात आली आहे. त्याशिवाय मुनीर यांना अनिर्बंध अधिकार देतानाच त्यांच्याकडे संरक्षण, लष्कर आणि नौदलाचे संपूर्ण कमांड देण्यात आले, हा धोका आहे. कारण मुनीर आता पाकचे सर्वसत्ताधीश बनू शकतात. याचा अर्थ पूर्वी पाकच्या लष्करप्रमुखांकडे काही अधिकार होते, आता संपूर्ण अधिकार आले आहेत. पाकिस्तान हे नेहमीच लष्करशहांच्या राजवटींनी त्रस्त झाले आहे. १९४७ पासून पाक लष्करी राजवटीच्या अमलाखालीच सर्व काळ होते. जनरल अयुब खान, जनरल याह्या खान आणि नंतर जनरल झिया उल हक यांच्या एकामागोएक राजवटींनी पाकला सदा आपल्या हुकूमशाहाखाली ठेवले आहे.
पाकमध्ये जो नेता सत्तेवर येतो तो तेथील लष्करशहाच्या आपण ब्ल्यू आईड बॉय कसे राहू याच चिंतेत आपली वर्षे घालवतो. इम्रान खान काही काळ तेथील लष्करी राजवटीचे ब्ल्यू आईड बॉय होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्कराची खप्पा मर्जी झाली आणि आज ते तुरुंगात आहेत. मुनीर हे अनिर्बंघ सत्ताधारी झाले. त्यामुळे ते काय करणार हे स्पष्ट आहे. ते सर्वप्रथम जी काही पाकमध्ये लोकशाही आहे तिला नख लावणार हे उघड आहे. पाकमध्ये लोकनियुक्त सरकारांना सत्तेवर राहाता येते जोपर्यंत तेथील लष्करप्रमुखांची परवानगी असेल तोपर्यंतच हे पाकचं वास्तव आहे. त्यामुळे पाकमध्ये हायब्रीड सरकार असते. म्हणजे नागरी नेते आणि लष्करप्रमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यात सत्ता वाटून घेतली जाते. हाय ब्रीड पॉवर याचा अर्थ खरी सत्ता लष्कराच्या हातात असते आणि त्यामुळे लोकशाही तेथे रुजू शकत नाही हा फार मोठा धोका आहे. या पॉवर शेअरिंग करारात महत्त्वाची खाती म्हणजे परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक निर्णय हे लष्करशहांकडे असतात. त्यामुळे लोकशाहीला केवळ आभासी स्वरूप येते. या व्यवस्थेत सर्वात मोठा दोष म्हणजे लोकशाहीची गळचेपी केली जाते. वारंवार आपण पाकमध्ये हे पाहिले आहे आणि त्याच्याविरोधात कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज दाबून टाकला जातो. पाकमधील प्रख्यात मानवी हक्क कार्यकर्त्या अस्मा जहांगीर यांनी पाकिस्तानी लष्करी राजवटीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला आणि त्यांनी लष्करशाहीने नागरी राजवटीत कसा वारंवार हस्तक्षेप केला त्याविरोधात आंदोलन पुकारले. लोकशाहीच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. पण आता मुनीर यांच्या अनिर्बंध अधिकाराने त्यांच्यासारख्या कुणाचेच काहीच चालणार नाही हे सत्य आहे. या घटनादुरुस्तीमुळे मुनीर यांचे वर्चस्व झिया उल हक यांच्या सत्तेच्या पलीकडे जाऊ शकते. आठव्या घटनादुरुस्तीमुळे झिया उल हक यांना अनिर्बंध अधिकार प्राप्त झाले होते. पण आता मुनीर हे तर सर्वात शक्तिशाली पाकचे लष्करशहा होतील. हा सर्व जगातील लोकशाहीवाद्यांना धोका आहे. तसेच या बदलांमुळे नागरी अधिकार आणि न्यायपालिका यांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे. पाकच्या लष्करशहांना पाकच्या घटनेने संपूर्ण संरक्षण दिले असले तरीही पाकच्या जनतेला आणि लोकशाही प्रक्रियेला हा फार मोठा धोका आहे. अगदी साधा सोपा अर्थ सांगायचा, तर असीम मुनीर यांच्या ताब्यात सत्तेचे संपूर्ण केंद्रीकरण होणार आहे. ते आयुष्यभर पाकचे फील्ड मार्शल राहतील. इतकेच नव्हे तर त्यांना खटल्यांपासून आणि अटकेपासूनही मुक्तता मिळणार आहे.
आता मुनीर याचे अधिकार अनिर्बंध वाढणार असल्याने साहजिकच भारताला मोठा धोका आहे. तसे तर मुनीर भारताविरोधात काही करू शकत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस मुनीर यांची सत्ता किती दुबळी आहे हे सिद्ध झाले आहे. पण ते अतिरेक्यांना हातात धरून भारताला ताप देऊ शकतात. त्यामुळे भारताला आता फार सावध राहावे लागणार आहे. पाकमध्ये कोणताही निर्णय हा भारताला डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला असतो. हे विसरून चालणार नाही. पाकचे लष्करशहा आणि आयएसआय यांसारख्या संघटना ज्यांना भारतात दहशतवादी हल्ले घडवू्न वारंवार येथे अस्थिरता निर्माण करायची आहे, त्यांना हा मोठा बूस्ट मिळेल, कारण मुनीर यांच्या अनिर्बंध सत्तेमुळे या संधटनेला मोठाच हातभार लागेल. भारताला सावध राहावे लागणारच आहे पण पाकच्या जनतेने या घडामोडींकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. कारण अंतिमतः त्यांच्यावरच हे संकट येणार आहे. कोणताही लष्करशहा प्रथम जनतेला आकर्षित करतोच आणि नंतर आपली नखे बाहेर काढतो. हिटलर आणि मुसोलिनी किंवा पाकमधील कोणताही लष्करशहा यांनी हेच केले होते. त्यामुळे भारतापेक्षाही जास्त धोका पाकच्या सामान्य जनतेला जास्त आहे. या घटनादुरस्तीमुळे मुनीर यांना आण्विक असेट्सवर हक्क मिळाले आहेत. हा तर भारताला जास्त धोका आहे. कारण भारत आज जरी अण्वस्त्र सज्ज असला तरीही कुणाच्या हाती ही अण्वस्त्रे पडतील आणि ते कुणाविरोधात त्यांचा वापर करतील यावर काहीही धरबंद उरणार नाही. पाकमधील सत्ता समतोल संपूर्ण बदलला आहे आणि तो संपूर्ण लष्कराच्या हातात गेला आहे. हाच या बाबतीतील सर्वात मोठा दोष आहे. पाकमधील घटनात्मक व्यवस्था आता सशस्त्र दलाकडून दिली जाईल, ही बाब सर्व जगाला धोकादायक आहे.






