Tuesday, November 18, 2025

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नव्या योजनेनुसार वरळी आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात दोन विस्तृत सबवे उभारले जाणार आहेत. या सुविधा उपयोगात आल्यावर मेट्रो स्टेशनपासून महत्त्वाच्या व्यावसायिक, सांस्कृतिक आणि वाहतूक केंद्रांपर्यंत थेट पादचारी जोडणी निर्माण होणार आहे.

पहिला सबवे वरळीतील नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्टेशनशी जोडला जाणार आहे. अंदाजे १.६ किमी लांबीचा हा मार्ग वरळी प्रोमेनेड, नेहरू प्लॅनेटोरियम, कोस्टल रोडजवळ उभारली जाणारी नवीन बाग, माजी वरळी डेअरीच्या जागेवर होणारे व्यावसायिक केंद्र या प्रमुख ठिकाणांपर्यंत सुसंगतपणे जोडल्याने वर्ली परिसरातील वाहतूक कमी होण्यास आणि पादचारी सुरक्षेत वाढ होण्यास मदत होईल.

BKC सबवे – बुलेट ट्रेन टर्मिनलशी थेट जोडणी

दुसरा सबवे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) मेट्रो स्टेशनपासून सुरू होऊन १.४ किमी अंतरावर असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनलपर्यंत नेईल. हा सबवे BKC मधील महत्त्वाच्या कार्यालयीन, व्यावसायिक व सार्वजनिक स्थळांशीही जोडला जाईल, ज्यामुळे हा भाग प्रमुख इंटरचेंज हब म्हणून अधिक मजबूत होईल.

दोन्ही सबवेंसाठीची एकत्रित लांबी ३ किमीपेक्षा जास्त असून, MMRCL लवकरच या प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी एका विशेष एजन्सीची नियुक्ती करणार आहे. हीच एजन्सी बांधकामाच्या काळात प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळेल, अशी माहिती MMRCL चे संचालक आर. रमणा यांनी दिली.

वरळी डेअरी प्लॉटच्या व्यावसायिक विकासाचा मार्ग मोकळा

या प्रकल्पातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरळी डेअरीचा मोठा भूखंड. शासकीय स्तरावर या जागेचा व्यावसायिक वापरासाठी बदल करण्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. शहरी विकास विभाग DCPR मध्ये आवश्यक बदल करणार असून, या परिसराचे नियोजन MMRDA कडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या जागेचा पुनर्विकास आता गतीने होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment