Tuesday, November 18, 2025

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात सोमवारी झालेल्या तीव्र चकमकीत हिडमा ठार झाल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.सुरक्षा दलांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंध्र प्रदेश–छत्तीसगड–तेलंगणा या तीन राज्यांच्या संगमावर असलेल्या घनदाट जंगल परिसरात संयुक्त दलांनी पहाटेपासून शोधमोहीम सुरू केली होती. या भागात माओवादी तळांची संख्या मोठी असून, सुरक्षा दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून नक्षलवादी अनेकदा अचानक हल्ले होत होते.

शोधमोहीम अधिक खोलवर गेल्यानंतर माओवादी संघटना आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला. काही वेळ चाललेल्या या चकमकीत किमान सहा माओवादी ठार झाले असून, त्यात हिडमा व त्याची पत्नी राजे उर्फ राजक्का यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून, जंगलात अनेक गुहा आणि दऱ्यांमध्ये इतर माओवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियन १ चा तो प्रमुख होता आणि त्यानंतर सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीमध्ये स्थान मिळवणारा बस्तरमधील एकमेव तरुण आदिवासी नेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. हिडमाच्या नेतृत्वाखालील तुकड्यांनी सुरक्षा दलांवर अनेक घातक हल्ले केले. त्याने आखलेल्या अंबुश तंत्रामुळे अनेक जवान शहीद झाले. याच कारणाने त्याच्यावर केंद्र व राज्य सरकारने एकूण ६ कोटींचे बक्षिस जाहीर केले. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार , हिडमा हा झालेल्या 26 मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार होता. यात ताडमेटला, बुरकापाल आणि मिनपा येथे झालेले भीषण हल्ले महत्वाचे आहेत . या हल्ल्यांमध्ये अनेक पोलिस जवानांनी प्राण गमावले होते, तसेच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जात होते.

हिडमाच्या मृत्यूमुळे बस्तर, सुकमा, बीजापूर परिसरातील माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. संयुक्त दलांनी परिसरात शस्त्रे, दळण–वळण साधने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. जंगल परिसर पूर्णपणे सील करून उर्वरित माओवादी सदस्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि अत्याधुनिक सेन्सर उपकरणे वापरण्यात येत आहेत.

Comments
Add Comment