Monday, November 17, 2025

सुंदर मी होणार... भाग - २

सुंदर मी होणार... भाग - २

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके

मागील लेखात आपण अंतरंग सौंदर्याचा विचार करत होतो. अंतरंग सौंदर्य म्हणजे अंतःकरणाचं सौंदर्य. अंतःकरण म्हणजे प्रामुख्यानं मन, बुद्धी आणि चित्त. अंतःकरणात प्रथम मनाचा विचार केला आहे. पंचज्ञानेंद्रियांनी जाणलेल्या कोणत्याही गोष्टीची, प्रसंगाची जाणीव सर्वप्रथम मनामुळे होते. मनाला त्याची जाणीव होते म्हणजे मनानं त्याची नोंद घेतली जाते.

मनातील जाणिवेनुसार भावना निर्माण होतात. या भावना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या असतात. आनंद, उत्साह, दया, करुणा, आदर, प्रेम, वात्सल्य, सहानुभूती, सौहार्द, मैत्री, आत्मविश्वास, व्यक्तीच्या गुणांविषयी कर्तृत्वाविषयी वाटणारं कौतुक, अभिमान इत्यादी सकारात्मक भावना आहेत. आपला अनुभव आहे की या भावना आपल्यात सकारात्मकता निर्माण करतात. या सुंदर भावना आहेत. याविरुद्ध क्रोध, संताप, द्वेष, असूया, कठोरता, क्रौर्य इत्यादी नकारात्मक भावना आहेत. या भावना त्या त्या क्षणी तात्पुरता जोम अंगात निर्माण करत असल्या तरी अंततः त्या आपल्याला दुःखच देतात. अशा भावना सगळ्याच गोष्टींमध्ये दोष शोधतात, नकारात्मकता पाहतात. सकारात्मक अर्थात सुंदर भावना सर्व गोष्टीत चांगुलपणा आणि सौंदर्य पाहायला शिकवतात. भावना मनात जागृत होण्याची प्रक्रिया इतकी वेगात घडत असते की आपल्याच मनात निर्माण झालेल्या भावनांची जाणीव आणि ओळख आपल्याला नसते. मनात निर्माण झालेल्या भावना ओळखता येणं हे भावनिक सौंदर्य वाढवण्याचं पहिलं पाऊल आहे. आपल्या मनातल्या भावना ओळखून त्यांना नियंत्रित करणे शक्य आहे. भावना नियंत्रित करणं म्हणजे पूर्णपणे थांबवणं नाही. भावना आपण जन्मतःच घेऊन आल्यामुळे कुठलीच भावना मनातून पूर्णपणे काढून टाकता येत नाही; परंतु कुठल्या भावनेचा उपयोग कसा आणि कधी करायचा हे मात्र प्रयत्नांनी ठरवता येतं. म्हणूनच भावनांचं नियंत्रण म्हणजे राग, द्वेषादी नकारात्मक भावना पूर्णपणे काढून टाकणं आणि भावनाशून्य होणं नव्हे, तर नकारात्मक भावनांची तीव्रता कमी करणं आणि त्यांना सकारात्मकतेकडे वळवणं. कुठल्याही घटनेवर, कोणाच्याही कृतीवर, बोलण्यावर पटकन प्रतिक्रिया न देता विचार करून प्रतिसाद देणं भावनांवर नियंत्रण आणलं तरच शक्य होईल. आपल्या मनातल्या भावना ओळखणारा आणि भावनांशी मैत्री केलेला मनुष्य लहान लहान गोष्टीत उत्तम आणि उदात्त पाहायला शिकतो. अनुभवांशी समरस होऊ शकतो. मनाच्या योगे आपल्या भावनांची ओळख करून त्यांचं सौंदर्य वाढवणं, त्यांचं उदात्तीकरण करणं शक्य आहे; परंतु यासाठी मन स्थिर व्हायला हवं. मन स्थिर आणि शांत करण्यासाठी प्राणायाम, प्रत्याहार आणि धारणा या अष्टांगयोगातील पायऱ्या अतिशय उपयुक्त आहेत. भक्तियोग, मंत्रपठण, नामस्मरण हेही भावनांना शांत करण्याचे प्रभावी उपाय आहेत.

बौद्धिक सौंदर्य - आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वातील  सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धी. मनानं भावनांवर नियंत्रण आणता येतं. मनावर नियंत्रण आणायचं, तर बुद्धी आवश्यक आहे. मनापेक्षा बुद्धीची शक्ती अधिक आहे. निश्चय करणं हे बुद्धीचं महत्त्वाचं कार्य आहे. मनानं कितीही विकल्प समोर ठेवले तरी त्यातला कोणता निवडायचा किंवा निवडायचा की नाही हे बुद्धी ठरवते. थोडक्यात, विचार करणं, विचारांची निश्चिती करणं म्हणजे पक्की मत ठरवणं हे कार्य बुद्धी करते. बुद्धीच्या निर्णयावर भावना उद्दीपित होणं म्हणजे जागृत होणं तसेच त्यानंतर होणारं मनुष्याचं वर्तन आणि मनुष्याचं बोलणं अवलंबून असतं.

मनुष्य जसे विचार करतो तशा भावना निर्माण होतात जशा भावना आणि विचार असतात तशी कृती होते आणि तसेच मनुष्य बोलतो. त्यामुळेच विचार सकारात्मक असतील, तर सकारात्मक भावना निर्माण होतील आणि आपोआप कृती आणि बोलण्यामध्येही ती सकारात्मकता प्रतीत होईल. बुद्धी, मन, भावना, कृती आणि उक्ती असा हा आंतरेंद्रियांपासून बाह्य इंद्रियांपर्यंत क्रम आहे. यांमध्ये समरसता आणि संतुलन असणं म्हणजे आंतरिक सौंदर्य.

आपल्याकडे जे आहे तेच आपण इतरांना देऊ शकतो या नियमानुसार ज्या व्यक्तीमध्ये आंतरिक सौंदर्य, सकारात्मकता असते ती व्यक्ती सर्वांमध्ये सौंदर्य पाहते. लहान लहान कृतींमध्ये, छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधते. त्यामध्ये इतरांनाही सहभागी करून घेते. सामान्य माणसाला सौंदर्यहीन वाटणाऱ्या गोष्टीतही अशा व्यक्तीला सौंदर्य दिसते.

एका मूर्तिकारानं एकदा सुंदर मूर्ती घडवली. मूर्ती पाहणारे त्याचं कौशल्य पाहून आश्चर्यचकित होत होते. एका व्यक्तीनं त्याला विचारलं, "इतकी सुंदर मूर्ती तुम्ही कशी काय घडवलीत?" त्यावर त्यानं उत्तर दिलं की मूर्ती या पाषाणात होतीच. मी फक्त नको असलेला भाग काढून टाकला. सामान्य माणसाला जो दगड आकारहीन वाटत होता त्यामध्ये मूर्तिकाराला सौंदर्य दिसत होतं. म्हणूनच म्हणतात ती सौंदर्य हे पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं त्या वस्तूवर नाही. मात्र ही सौंदर्यदृष्टी विकसित करायची तर अंतःकरण शुद्ध, सकारात्मक विचारांनी आणि भावनांनी शिगोशीग भरायला हवं. यासाठी योग हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मागील अनेक लेखात याविषयी सांगितलंही आहे.

मनुष्य खरोखरच भाग्यवान आहे की, त्याला निसर्गानं बुद्धी विकसित करायचं, आपल्या भावना ओळखून त्यांना नियंत्रित करायचं व सकारात्मक करायचं, इतकंच नव्हे तर त्या भावनांना भाषा, कला, यांमधून आविष्कृत करायचं असामान्य सामर्थ्य दिलं आहे.मागील लेखात सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आपला अंतःकरण म्हणजे परिस आहे. मात्र या देवदत्त असामान्य देणगीची आपल्याला पुरेशी जाणीव नाही. त्यामुळे आपण त्याचा पुरेसा विकासही करत नाही.

शरीराचं म्हणजेच बाह्य सौंदर्य महत्त्वाचं आहेच; परंतु याहीपेक्षा अंतरंगाचं सौंदर्य जीवनात अनेक सुखद रंग भरणार आहे. बाह्य सौंदर्याची छाप पहिल्या क्षणाला पडेल; परंतु फार काळ टिकणार नाही. वर्तनातून आणि बोलण्यातून अंतरंग सौंदर्याची पडलेली छाप ही नित्य टिकणारी असते. खरंतर सख्यांनो, आंतरिक सौंदर्य वाढू लागतं तसं तसं बाह्य सौंदर्यही उमलणाऱ्या फुलाप्रमाणे खुलायला लागतं. आंतरिक सौंदर्य खुलवायचं तर अंतरंग योगाशिवाय म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान यांशिवाय पर्याय नाही.

Comments
Add Comment