नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी माहिती सूत्रांमार्फत दिली जात आहे. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी हत्याकांड, सिद्धू मूसेवाला हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावर गोळीबाराचा मास्टरमाइंड आहे.अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे आणि त्याने लॉरेन्स टोळीच्या प्रत्येक कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले असून केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. अनमोल बिश्नोईवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येआधी शूटर अनमोलच्या संपर्कात होते. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर घटनेपूर्वी अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता, असे यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि तीन संशयित शूटर यांच्यात कॅनडा आणि अमेरिकेत असताना स्नॅपचॅटद्वारे संदेशांची देवाणघेवाण झाली.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
- अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे.
- अमेरिकेत बसून तो भारतात गुन्हेगारी कारवाया करत होता.
- अनमोलविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये मूसेवालाच्या हत्येसाठी शस्त्रे आणि रसद पुरवणे यांचाही समावेश आहे.
- मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती.
- १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकीची त्यांच्या मुलाच्या ऑफिसबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, अनमोलही त्या गोळीबार करणाऱ्यांच्या संपर्कात होता.
एनआयएने अनमोलला 'मोस्ट वॉन्टेड' व्यक्ती म्हणून घोषित केले आहे आणि त्याच्या डोक्यावर '१० लाख' रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले आहे.






