मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी द्यावी, अशी सातत्याने होत असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला असून आता राज्यातील सर्व इलेक्ट्रिक एसटी बसला द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी लागू करण्यात आली आहे.
या निर्णयाचा फायदा नाशिक-मुंबई मार्गावरील ई-शिवाई बस सेवेवर होणार आहे. या निर्णयानंतर ई-शिवाई बस समृद्धी महामार्गावरून धावू शकणार आहे. जुन्या महामार्गावरील कोंडी, टोल प्लाझांवरील विलंब टळणार आहे.
मंत्री भुजबळ यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ’ जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३० या कालावधीत खासगी, सरकारी व निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
प्रवाशांना होणारे प्रत्यक्ष फायदे
- नाशिक–मुंबई दरम्यानच्या प्रवाशांवर या निर्णयाचा स्पष्ट आणि मोठा परिणाम दिसणार आहे.
- जुन्या महामार्गावरून प्रवास करताना साधारण ४.५ तास लागत होते.
- समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास प्रवासाचा वेळ तासाभराने कमी होऊन फक्त ३.५ तास लागतील.
- वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.
- प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायी बनेल.
- एसटी महामंडळाची वार्षिक कोट्यवधी रुपयांची टोलची बचत होईल.
संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बस वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई–शिर्डी मार्ग, अटल सेतू (शिवडी–न्हावा शेवा), मुंबई–छत्रपती संभाजीनगर, मुंबई–नागपूर, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–नागपूर या मार्गांवर भविष्यात ई-बसेस सुरू झाल्यानंतर त्यांनाही टोलमाफी लागू होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बस वाहतुकीला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.






