हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल सोमवारी (दि. १७) येथे पुन्हा एकदा एक दुर्दैवी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने एका २० वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०) असे आहे. ती हिंजवडी येथील मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्त्यावर राहत होती. सोमवारी दुपारी ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चालक ताब्यात: या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपरचालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला हिंजवडी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या आयटी परिसरात अवजड वाहनांमुळे सातत्याने अपघात होत असल्याने, येथील वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सुरक्षिततेचे उपाय यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक झुपूक" अंदाजात आणि मनमिळाऊ ...
बापाच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत
हिंजवडी आयटी परिसरातील जांबे-मारुंजी रस्त्यावर काल (सोमवारी) झालेल्या अपघाताने संपूर्ण तन्वी साखरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा थरार आणि दुर्दैवी तपशील आता समोर आला आहे. अपघातात मृत्यू झालेली तन्वी साखरे (वय २०) ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (MH-१४ KV-३८८३) जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेने जात होती. याच वेळी, पाठीमागून आलेल्या डम्परने (MH-१४ HU-९८५५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तन्वी डम्परच्या चाकाखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातात तन्वीचे वडीलही जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, तिच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न घेऊन ती अभ्यास करत असताना, अवजड वाहनांच्या निष्काळजीपणामुळे तिचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार
हिंजवडीतील आयटी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा संताप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी बेदरकारपणे चालवल्या गेलेल्या एका डम्परखाली २० वर्षीय तरुणी तन्वी साखरे हिचा चिरडून नाहक बळी गेल्याने हा संताप अधिक उफाळून आला आहे. हा भीषण अपघात घडल्यानंतर डम्परचालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, हिंजवडी पोलिसांनी केलेल्या त्वरित तपासानंतर सायंकाळच्या सुमारास फरार आरोपी अजय ढाकणे याला बेड्या ठोकण्यात आल्या. या अपघातानंतर आता हिंजवडी पोलिसांना अखेर जाग आली आहे. त्यांनी डम्पर किंवा रेती-मिक्स वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या मालिकेसाठी पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. वारंवार होणारे अपघात, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि कोणतेही निर्बंध नसलेली जड वाहनांची वाहतूक याला नेमके कोण कारणीभूत आहे? पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वाहतूक विभागाकडून या गंभीर प्रश्नांकडे सातत्याने लक्ष का दिले जात नाही, अशा अनेक ज्वलंत प्रश्नांनी या निमित्ताने डोकं वर काढलं आहे.
हिंजवडीतील रस्त्यांची दुरवस्था अपघातांना कारणीभूत
हिंजवडी आयटी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांना केवळ अवजड वाहनेच नव्हे, तर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था देखील प्रमुख कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे अवजड वाहनांमधून रस्त्यावर पडणारी खडी, वाळू आणि डबर! यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडतात. त्यात भर म्हणून, आयटी परिसरातील काही रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली भयानक दुरवस्था आणि त्यावरून सुसाट धावणारी अवजड वाहने अपघातांना आमंत्रण देत आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तन्वी साखरेच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावठाण रस्ता आणि साखरे कुटुंब राहत असलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी केली. स्मशानभूमीत आपल्या लेकीच्या अंत्यसंस्कारावेळी बहीण आणि आई-वडिलांनी केलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. आई आणि बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थसुद्धा हळहळले आणि सर्वांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.





