मुंबई : राज्यात महायुतीत मिठाचा खडा पडतो की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीवर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि अनुपस्थित राहिले. महत्वाची बाब ही आहे की, या नाराजी नाट्यादरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मात्र या बैठकीस उपस्थित होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
फोडाफोडीचे राजकारण हे या नाराजी मुख्य कारण होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडणार नाही, असा निर्णय फडणवीस आणि शिंदे उपस्थित असलेल्या बैठकीत झाला.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
महायुतीतल्या कुरबुरींचे वृत्त मीडियाने देण्यास सुरुवात केली. ही बातमी येऊ लागताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मीडिया प्रतिनिधींनी 'ऑफ द रेकॉर्ड' प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. खाली काही असले तर सर्वात जास्त जागांवर युती करायची आहे. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहायचे आहे. युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. भाजपच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. शिवसेनेच्या नेत्यांना या बाबतीत समज देण्याची जबाबदारी माझी", असं थोडक्या पण स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांनी सांगितले.






