मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला चेहरा असलेले नवाब मलिक कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.
राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या शक्यता आहे. याआधीच नवाब मलिक यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या अंतर्गत पीएमएलए न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्यावर डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत; असेही ईडीच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. पीएमएलए कायद्याच्या कलम ३,४ आणि १७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. नवाब मलिक यांनी आरोप फेटाळले आहेत. आता पीएमएलए न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे. जर पुरवणी आरोपपत्र दाखल झालं तर दाऊद किंवा दाऊदशी संबंधित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. तब्येतीच्या कारणामुळे सध्या नवाब मलिक जामिनावर आहेत. नवाब मलिक यांनी डी कंपनीच्या हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानंतर दैनंदिन सुनवणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.






