मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक झुपूक" अंदाजात आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्याने 'गुलिगत किंग' हे टोपणनाव मिळवले आणि अखेरीस 'बिग बॉस'च्या प्रतिष्ठित ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या शोमुळे सूरजचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. याच शोदरम्यान सूरजने एक मोठे स्वप्न पाहिले होते, ते म्हणजे स्वतःचे एक हक्काचे घर असावे. कठोर मेहनत आणि चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर अखेर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. नुकताच सूरज चव्हाणने आपल्या नव्या घरात थाटामाटात गृहप्रवेश केला आहे. या खास आणि भावनिक क्षणांचा सुंदर व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे चाहते आणि मराठी सिनेसृष्टीतील मित्रांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 'बिग बॉस'मधील यशानंतर सूरजने वैयक्तिक आयुष्यातही मोठे यश मिळवल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
काट्यांनी भरलेल्या पायवाटांवरून 'गुलिगत धोका' पर्यंत
View this post on Instagram
'गुलीगत धोका' फेम आणि 'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाण आज जरी लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करून बसला असला, तरी त्याचा आतापर्यंतचा जीवनप्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षाचा राहिला आहे. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढलेल्या या मुलाने स्वतःच्या मेहनतीने यशाचे शिखर गाठले. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर आलेला हा मुलगा आज 'गुलिगत किंग' म्हणून अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. नुकताच सूरजच्या आयुष्यात मोठा आनंद आला आहे. त्याने पाहिलेल्या हक्काच्या घराचे काम अखेर पूर्ण झाले आहे आणि त्याने काल थाटामाटात गृहप्रवेश केला. लग्नाआधीच नव्या घरात प्रवेश करता आला याचा त्याला खूप आनंद असून तो समाधानी असलेला पाहायला मिळत आहे. घराच्या या आनंद सोहळ्यासोबतच आता त्याच्या आयुष्यात लग्नाची लगबग देखील सुरू झाली आहे. लवकरच सूरज चव्हाण वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करणार आहे. वैयक्तिक आयुष्यातील हे दोन मोठे शुभ सोहळे एकाच वेळी सुरू झाल्याने सूरज सध्या खूपच खुश आणि उत्साही आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला
सोशल मीडिया रील्समुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या आणि त्यानंतर 'बिग बॉस मराठी' मुळे खरं नशीब बदललेल्या सूरज चव्हाण यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 'बिग बॉस'चा शो संपताना सूरजने एक महत्त्वपूर्ण निश्चय केला होता, तो म्हणजे गावी जाऊन सर्वात आधी आपलं हक्काचं घर बांधणार. अखेर, त्याचा हा निश्चय आता पूर्णत्वास आला आहे. या स्वप्नपूर्तीमध्ये राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याने मोलाची भूमिका बजावली. बारामतीच्या या सुपुत्राला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'लवकरात लवकर हक्काचं घर बांधून देण्यात येईल,' असा शब्द दिला होता. अजित पवारांनी दिलेला हा शब्द पूर्ण झाल्यानंतर, सूरजने आता आपल्या याच नव्या घरात थाटामाटात गृहप्रवेश केला आहे. या यशानंतर सोशल मीडियावर सूरजने याचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आणि हितचिंतक त्याच्या या वैयक्तिक यशाचे जोरदार अभिनंदन करत आहेत.
'गुलिगत किंग'च्या यशाने चाहते गहिवरले
'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाण यांच्या नव्या घरात झालेल्या गृहप्रवेशानंतर, त्यांच्यावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा खडतर जीवनप्रवास आणि त्यानंतर मिळालेले यश पाहून चाहते खूपच भावनिक झाले आहेत.सूरजच्या या यशाबद्दल एका नेटकऱ्याने अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "खरंच सूरजला बघून अभिमान वाटतो. आई जगदंबेच्या कृपेने सर्व काही ठीक झालं. देवाच्या परीक्षांमध्ये सूरज तू पास झालास! खरंच अभिमान वाटतो. तुला पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा..." तर आणखी एका नेटकऱ्याने सूरजच्या नशिबाचे कौतुक करताना म्हटले आहे की, "यावरून कळते की नशिबात लिहिलेले कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही." अशाप्रकारे, लाखो चाहते विविध भावनिक कमेंट्स आणि संदेशांद्वारे सूरज चव्हाणवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. त्यांच्या मते, कठीण परिस्थितीतून बाहेर पडून स्वतःचं घर घेणं हे सूरजच्या परिश्रमाचं आणि नशिबाचं प्रतीक आहे.






