Monday, November 17, 2025

शिउबाठाला मोठे खिंडार! नाशिकच्या अद्वय हिरेंची घरवापसी, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार पक्षप्रवेश

शिउबाठाला मोठे खिंडार! नाशिकच्या अद्वय हिरेंची घरवापसी, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार पक्षप्रवेश

नाशिक: महाराष्ट्राच्या राजकारणात आज अजून एक पक्षांतर होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर झाल्यामुळे पक्षांतराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. अद्वय हिरे यांच्या भाजप एन्ट्रीमुळे ठाकरेंच्या गटाला नाशिकमध्ये खिंडार पडले आहे. हिरे यांचा पक्षप्रवेश आज  भाजपच्या मुंबईतील कार्यालयात होणार आहे.

नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या मालेगावात हिरे कुटुंबियांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या गटाचे मोठे नुकसान झाले आहे. याउलट अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची नाशिक जिल्ह्यात मोठी ताकद वाढणार आहे. अद्वय हिरेंसोबतच अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेळके यांच्याही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

मुळात हिरे पहिले भाजपमध्येच होते. मात्र मधल्या काळात त्यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण विधानसभेवेळी मंत्री दादा भुसे यांचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याने त्यांचा पराभव झाला होता. तसेच भाजपचा बिहारमधील विजयसुद्धा त्यांच्या भाजप प्रवेशासाठी महत्त्वाचा ठरला असल्याची शक्यता आहे.

नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. आजपासून प्रत्येक पक्ष खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

Comments
Add Comment