Monday, November 17, 2025

५०० कोटींचे रुग्णालय अजित पवारांच्या भाच्याला?

५०० कोटींचे रुग्णालय अजित पवारांच्या भाच्याला?

अंजली दमानिया यांचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदी करत असतानाच हे प्रकरण प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर पार्थ पवारांना हा व्यवहार थांबवावा लागला. मात्र, या व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुंबई महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ‘आता आणखी एक ५०० कोटींचे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाइकांना?’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

शताब्दी रुग्णालय हे पीपीपी तत्त्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची होती. ही ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांची असून ते अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत. तर, पद्मसिंह पाटलांचे पुत्र तथा अजित पवारांचे भाचे राणा जगजीतसिंह पाटील हे या ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील हे भाजपचे नेते असून ते तुळजापूरचे आमदारही आहेत.

दमानिया अजित पवार यांच्यावर टीका करत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांची पाठराखण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा