Sunday, November 16, 2025

स्टॉपलॉस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार...

स्टॉपलॉस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार...

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात नुकसान नियंत्रणात ठेवणे म्हणजेच यशस्वी ट्रेडिंगचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व. अनेक वेळा बाजार आपल्या अपेक्षेच्या उलट दिशेने हलतो आणि मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी ट्रेडरला सर्वात जास्त मदत करणारे साधन म्हणजे स्टॉपलॉस.

स्टॉप-लॉस हा असा किंमत स्तर असतो की जिथे शेअर पोहोचताच तो आपोआप विकला जातो आणि नुकसान मर्यादीत राहते. या लेखात आपण स्टॉपलॉसचे प्रकार सविस्तरपणे जाणून घेऊ. १) प्राइस स्टॉपलॉस हा सर्वात मूलभूत प्रकार आहे. यात ट्रेडर ठरावीक किंमत निश्चित करतो. शेअरची किंमत त्या पातळीपर्यंत खाली आली तर ऑर्डर आपोआप सेल होते. उदा. एखादा शेअर ₹२००वर ट्रेड करत असेल आणि आपण स्टॉप-लॉस ₹१९० ठेवला, तर जेव्हा किंमत १९०ला येईल तेव्हा विक्री ऑर्डर लागेल.

२) ट्रेलिंग स्टॉपलॉस नफा वाढवूनही सुरक्षितता ठेवण्यासाठी हा प्रकार सर्वात प्रभावी आहे. ट्रेलिंग स्टॉपलॉसमध्ये स्टॉपलॉस किंमत बाजार भावानुसार वर किंवा खाली सरकत राहते. यामुळे नफा ‘लॉक’ होत जातो. उदा. शेअर ₹२०० ला घेतला आणि १० रुपये ट्रेलिंग स्टॉप-लॉस ठेवला. शेअर ₹२१० वर गेला → स्टॉप-लॉस ₹२०० शेअर ₹२२० वर गेला → स्टॉप-लॉस ₹२१० म्हणजे बाजार वर गेल्यास आपला एसएल देखील वर जातो, पण खाली गेल्यास एसएल बदलत नाही.

३) स्टॉपलॉस लिमिट ऑर्डर (एसएल-एल) यात दोन किमती असतात - ट्रिगर प्राइस आणि लिमिट प्राइस. ट्रिगर प्राइस आली की लिमिट प्राइसवर विकण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार अधिक नियंत्रण देतो पण कधीकधी जलद बाजार हलचालीमध्ये ऑर्डर एक्झिक्यूट न होण्याचा धोका असतो.

४) स्टॉपलॉस मार्केट ऑर्डर (एसएल-एम) या प्रकारात फक्त ट्रिगर प्राइस सेट करावी लागते. ट्रिगर लागल्यावर ऑर्डर मार्केट प्राइसवर लगेच एक्झिक्यूट होते. ट्रेड नक्की लागण्यासाठी हा प्रकार चांगला असतो, पण किंमत थोडी जास्त किंवा कमी मिळण्याची शक्यता असते.

५) टक्केवारी-आधारित स्टॉपलॉस (पर्सेंटेज स्टॉप - लॉस) या प्रकारात शेअरच्या किमतीच्या विशिष्ट टक्केवारीने स्टॉपलॉस ठरवला जातो. उदा. ३% किंवा ५% एसएल. हा प्रकार स्विंग ट्रेडिंग किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीत वापरला जातो.

६) वेळ-आधारित स्टॉपलॉस इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बऱ्याच वेळा ठरावीक वेळेत अपेक्षित हालचाल न झाल्यास ट्रेडर मॅन्युअली एक्झिट घेतो. वेळेच्या आधारे घेतलेला असा बाहेर पडण्याचा निर्णय म्हणजे टाइम-बेस्ड स्टॉपलॉस.

७) तांत्रिक स्टॉपलॉस (टेक्निकल/ सपोर्ट - रेसिस्टंस स्टॉप-लॉस) चार्टवर दिसणाऱ्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेव्हल्सचा आधार घेत स्टॉपलॉस ठरवला जातो. उदा. महत्त्वाच्या सपोर्टच्या खाली एसएल ठेवला जातो. हा प्रकार अनुभवी ट्रेडर्सकडून जास्त वापरला जातो.

८) व्होलॅटिलिटी-आधारित स्टॉपलॉस काही स्टॉक्स खूप चंचल (volatile) असतात. अशावेळी एव्हरेज ट्रू रेंज (एटीआर) किंवा व्होलॅटिलिटी इंडेक्सच्या आधारे स्टॉपलॉस ठरवला जातो. जास्त चंचल स्टॉक्समध्ये स्टॉपलॉस अंतर जास्त ठेवावे लागते.

स्टॉपलॉस हा फक्त एक ऑर्डर नसून ते ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. योग्य प्रकारचा स्टॉप-लॉस निवडणे हे तुमच्या ट्रेडिंग शैलीवर, रिस्क घेण्याच्या क्षमतेवर आणि बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असते.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा