मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये वाढत्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हिंसाचाराविरोधात ‘जेन-झी’ च्या आवाहनावर शनिवारी हजारो युवक रस्त्यावर उतरले आणि मोठे प्रदर्शन केले. या दरम्यान प्रदर्शनकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. निदर्शकांनी दगड, हातोडा, फटाके, काठ्या आणि साखळ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या झटापटीत एकूण १२० जण जखमी झाले, तर २० आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. हे आंदोलन मुख्यत्वे राष्ट्राध्यक्षा क्लाउडिया शेनबाउम यांच्या सुरक्षा धोरणांवर आणि ड्रग कार्टेलविरोधातील शिथिल भूमिकेविरुद्ध आहे. विशेषत: मिचोआकान राज्यात ड्रग तस्करांविरुद्ध कार्यवाही करणारे महापौर कार्लोस मंजो यांच्या हत्येनंतर या आंदोलनाला आणखी वेग आला आहे.






