गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. अखेर अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वांत मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपमध्ये महिला पदाधिकाऱ्यांत प्रचंड उत्सुकता होती. उमेदवारीसाठी भाजप महिला जिल्हाध्यक्षा आणि माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, तसेच प्रणोती सागर निंबोरकर आणि रीना सतीश चिचघरे अशी चार नावे चर्चेत होती.
सुरुवातीला रीना चिचघरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सकाळपासून बोलले जात होते. मात्र दुपारी १ नंतर परिस्थितीत अचानक बदल झाला आणि शेवटच्या क्षणी पक्षाने ए.बी. फॉर्म प्रणोती सागर निंबोरकर यांच्याकडे वळवला. त्यामुळे पक्षांतर्गत सुरू असलेली चुरस एका क्षणात संपुष्टात आली.
प्रणोती निंबोरकर यांचा मुकाबला काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्याशी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याने पालिकेच्या परिसरात मेळाव्याचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दीमुळे काही वेळ वाहतुकीलाही खोळंबा झाला.






