नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांतील राजकीय आणि लष्करी स्तरावरील संवाद वाढल्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीत हळूहळू सुधारणा जाणवत आहे.
मागील एका वर्षात पूर्व लडाखमधील एलएसीवर वातावरणात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून भारत-चीनमधील व्यापक राजकीय चर्चांमुळे परस्पर समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. “जेव्हा राजकीय मार्गदर्शन स्पष्ट असते, तेव्हा त्याचा फायदा सैन्यदलांनाही होतो,” असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.
मागील वर्षभरात सीमारेषेवर १,१०० बैठकांचे आयोजन झाले, म्हणजे जवळजवळ रोज तीन बैठका. पूर्वी चर्चा फक्त कॉर्प्स कमांडर स्तरावर होत असत, परंतु आता संवादाचा स्तर खाली आणून बटालियन आणि कंपनी कमांडरपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक किंवा क्षेत्रीय प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटतात आणि वरीष्ठ पातळीवर पोहोचण्याची गरज पडत नाही, असेही जनरल द्विवेदी यांनी सांगितले.
जरी महत्त्वपूर्ण निर्णय उच्चस्तरीय बैठकीतच घेतले जातात, तरीही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संवादामुळे दोन्ही बाजूंमध्ये अधिक लवचिकता निर्माण झाली आहे. चीनला जर कोणतेही बांधकाम करायचे असेल तर ते आगाऊ कळवतात. भारतीय बाजूकडून हरकत नोंदवल्यास ते बांधकाम तत्काळ थांबवतात किंवा हटवतात. “सीमेवर परस्पर सहकार्य समाधानकारक स्तरावर आहे,” असे जनरल द्विवेदी म्हणाले.
मणिपूरमध्ये पुन्हा स्थैर्य परत येत असल्याचे जनरल द्विवेदी यांनी सांगितले. लोकांचा आत्मविश्वास वाढताना दिसत असल्याने, आगामी काही दिवसांत सर्व काही सुरळीत राहिले तर राष्ट्रपती मणिपूरचा दौरा करण्याची शक्यता आहे. समुदायांमध्ये संवाद वाढला तर बदल आणखी गतीने घडेल, असेही जनरल द्विवेदी म्हणाले.
शेजारी राष्ट्रांमधील अस्थिरतेचा भारतावर परिणाम होतो. म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांची भारत काळजी घेत आहे आणि त्यांनी स्वेच्छेने आपल्या देशात परतावे अशी अपेक्षा आहे. परंतु दहशतवादी गटांनी अनियंत्रित भूभागाचा वापर भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही, आणि त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जनरल द्विवेदी यांनी ठामपणे सांगितले.






