Sunday, November 16, 2025

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे. नवे मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील. युतीमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत झाले असून त्यानुसार, प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपद शक्य आहे, असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

नवीन सरकारमध्ये जनता दल (सं)जेडीयूला सुमारे १४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाने ८५ जागा जिंकत महायुतीच्या बळकटीकरणात केंद्रस्थानी भूमिका बजावली. जरी भाजपपेक्षा जागा कमी मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्रीपद जनता दल (सं)चे प्रमुख नितीशकुमार यांच्याकडेच राहणार आहे. गठबंधनाची स्थिरता आणि मागील कार्यकाळात निर्माण झालेल्या सामंजस्यपूर्ण कार्यपद्धतीचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलजेपी (रामविलास) ला १९ जागा मिळाल्याने तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. जितन राम मांझी यांच्या एचएएम (एस)ला एक पद मिळू शकते आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमलाही एक पद मिळू शकते.

बैठकीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला स्वीकारण्यासही सहमती झाली, ज्यामध्ये संतुलित सामायिक प्रतिनिधित्व राखले जाईल. नवीन सरकारचा शपथविधी १९ किंवा २० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ स्थापनेचे चित्र स्पष्ट होत असताना, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एनडीए देखील या समारंभाकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहत आहे, कारण युतीने एकूण २०२ जागा जिंकून चांगली कामगिरी केली. भाजपाचा दावा आहे की जनतेने जाती आणि धर्माच्या राजकारणाला नकार दिला आहे आणि एनडीएला निर्णायक जनादेश दिला आहे आणि या निकालाचा पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील निवडणुकांवरही परिणाम होईल.

नितीशकुमार दहाव्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

बिहारच्या राजकारणाचे समीकरण पुन्हा एकदा बदलले असून, राज्याचे अनुभवी नेते नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. सन २००० मध्ये पहिल्यांदा ते फक्त ७ दिवसांच्या कार्यकाळापासून मुख्यमंत्री झाले होते. २००५च्या निवडणुकीत एनडीएच्या विजयासह त्यांनी पहिल्यांदा पूर्ण पाच वर्षे सरकारचे नेतृत्व केले. २०१० मध्ये पुन्हा प्रचंड बहुमत मिळाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला होता. सन २०१५मध्ये मांझी सरकारनंतर सत्तेत पुनरागमन झाले. राजद-जनता दल (सं)या महाआघाडीला २०१५मध्ये विक्रमी विजय मिळाला आणि नितीश पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि तणावामुळे जुलै २०१७ मध्ये त्यांनी अचानक राजीनामा दिला, ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. २०१७ ते २०२० या काळात एनडीएशी पुन्हा हातमिळवणी करत ते मुख्यमंत्री झाले. २०२० च्या निवडणुकीत जनता दल (सं)चा पराभव झाला, तरीही एनडीए सत्तेत परतली आणि नितीश कुमारांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी एनडीए सोडून राजद–काँग्रेससोबत पुन्हा महाआघाडी स्थापन केली. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी महाआघाडीवर नाराजी व्यक्त करून एनडीएत परत प्रवेश केला आणि नवव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >