ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणाने मोठा दणका दिला आहे. बांग्लादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये हिंसाचार उफाळला होता. यादरम्यान हसीना यांनी निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिल्याचा आरोप होता. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हसीना यांनी 'मानवतेविरूद्ध गुन्हा' केल्याचे म्हणत प्राधिकरणाने हसीना यांना दोषी ठरवले आहे. त्यांना थेट मृत्यूदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर आता शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी प्राधिकरणाने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.
शेख हसीना म्हणाल्या की, त्यांना किंवा त्यांच्या आवामी लीग पक्षाला बाजू मांडण्याची योग्य संधी प्राधिकरणाने दिलेली नाही. यासोबतच त्यांनी प्राधिकरणावर पक्षपातीपणाचा आरोपही केला आहे. प्राधिकरणाने विद्यमान प्रशासनासाठी सार्वजनिकरित्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप हसीनांनी केला आहे.
हसीना पुढे म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणात (ICT) माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप मी फेटाळून लावते. गतवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राजकीय विभाजनात दोन्ही बाजूंनी झालेल्या सर्व मृत्यूंसाठी मी शोक व्यक्त करते. यादरम्यान मी किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आंदोलकांना मारण्याचे आदेश दिले नव्हते.'
हसीना आपली भूमिका मांडत म्हणाल्या की, मला माझी बाजू मांडण्यासाठी योग्य ती संधी देण्यात आलेली नाही. तर माझ्या अनुपस्थितीत माझ्या पसंतीच्या वकिलांना देखील माझी बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही. हसीना यांनी पुढे प्राधिकरणावर जोरदार टीका देखील केली आहे. त्या म्हणाल्या, 'नाव ICT असे असूनही ते काही आंतरराष्ट्रीय नाही, तर ते निष्पक्षही नाहीत.'






