उदय पिंगळे
तुमचे निर्धारित आर्थिक लक्ष विशिष्ट काळात पूर्ण करण्याचे ध्येय म्हणजे आर्थिक उद्दिष्ट. ते पूर्ण करण्यासाठी आधी ते नेमकं ठरवायला हवं आणि त्यादृष्टीने वाटचाल करायला हवी. आर्थिक भवितव्य सुकर करण्यासाठी खर्च नियंत्रणात असावेत त्याचं निश्चित नियोजन करायला हवं. आपलं आर्थिक उद्दिष्ट स्मार्ट असावं म्हणजे - एस = स्पेसीफीक म्हणजे निश्चित तुम्हाला नक्की काय हवंय ते निश्चित करा. मला पुढील वर्षी नातीच्या वाढदिवसासाठी पैसे बाजूला ठेवायला हवेत असा विचार न करता मला माझ्या नातीच्या १० महिन्यानंतर येणाऱ्या वाढदिवसासाठी ₹१०००/- वेगळे ठेवायला हवेत, असा निश्चित विचार करायला हवा. एम = मेजरेबल म्हणजे मोजता येणारे ठरवलेले ध्येय मोजता आले पाहिजे. मी क्रेडिट कार्डाची थकबाकी लवकरच फेडन याऐवजी मी येत्या सहा महिन्यात क्रेडिट कार्डची थकबाकी पूर्णपणे भरेन असा मोजता येणाऱ्या कालावधीचा विचार करायला हवा. ए = अॅचिव्हेबल म्हणजे शक्य असलेले ध्येय पूर्ण करता येईल असे असावे. मी बचत करेन ऐवजी येत्या ६ महिन्यात मला शक्य असलेले दरमहा ₹४०००/- बचत करून ₹२४,०००/- जमविन. आर = रीअलिस्टीक म्हणजे वास्तविक, खरेखुरे आपले धेय्य उपलब्ध गोष्टींचा विचार करून निश्चित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे. मी नियमित बचत करून कोट्याधीश होईन. या ऐवजी मी नियमित बचत करून येत्या जानेवारीपर्यंत सर्व कर्ज फेडीन. यानंतर पुढील डिसेंबरपर्यंत आवश्यक असा ६ महिन्यांचा निश्चित खर्च भागवला जाईल एवढा राखीव निधी निर्माण करीन. असा नेमका वास्तविक विचार करणारे असावे. टी = टाइम बाऊंड म्हणजे विशिष्ट काळात पुरे होणारे असे असावे. मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवीन, याऐवजी मी दरवर्षी पन्नास हजार असे पुढील दहा वर्षे वाचविन असा कालावधीचा दृष्टिकोन असायला हवा. अंदाजपत्रक आपण खर्च कसा आणि कुठे करणार याची योजना तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रक बनवणे. त्यामुळे आपल्याला मिळणारी रक्कम अपेक्षित खर्च, बचत, कर्जफेड, धेय्यपूर्तीकडील वाटचाल या सर्वांचा मागोवा घेता येतो. तुमची निवृत्ती योजना बनवा निवृत्ती योजना बनवण्याची सुरुवात आत्तापासूनच करा. त्यामुळे जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमचे अस्तित्वात असलेले राहणीमान कायम ठेवू शकाल. वाढते खर्च आणि महागाई यांची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. निवृत्ती नियोजन योजनाच तुमची निवृत्तीनंतरची स्वप्ने पूर्ण करेल आणि भविष्य सुरक्षित बनवेल. निवृत्ती योजना तयार करण्यास उपयुक्त युक्त्या - आधीपासूनच ठेवलेली शिल्लक निवृत्तीपर्यत चक्रवाढ गतीने वाढते. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी अपेक्षित असणारी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते. तुम्ही बाजूला जमा करत असणारी रक्कम एवढी मोठी असावी ज्यातून आपण अनपेक्षित खर्च आणि अन्य तातडीच्या गरजा पूर्ण करू शकाल. याशिवाय तुमचा आणि तुमच्या प्रियजनांची आर्थिक गरज भागवू शकेल एवढा जीवन विमा आणि वैद्यकीय विमा असल्यास जोखीम कमी होण्यास मोठी मदत होईल. जमा केलेली रक्कम एकाच मालमत्ता प्रकारात न ठेवता विविध मालमत्ता प्रकारात विभागली असता त्यातील एखादा प्रकार परतावा देऊ शकला नाही तर त्याची भरपाई दुसरीकडून झाल्याने जोखीम कमी होण्यास मदत होईल. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत असे म्हणतात ते यासाठीच. तुमचे निवृत्तीचे उद्दिष्ट आणि राहणीमान याचा विचार करून योजनेची निवड करावी. यासाठी मदत करणारे गणक सर्वत्र उपलब्ध आहेत. आपली निवृत्ती नियोजन योजना बनवण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. असे सल्लागार तुम्हाला तुमच्या वैयक्तीक गरजेनुसार उपयुक्त असणारी निवृत्ती नियोजन योजना बनवून देऊ शकतील. कर्ज घेण्यापूर्वी विचार करा काही अत्यावश्यक गरजा, अनावश्यक इच्छाची पूर्तता करण्यासाठी तसेच आजारपण अपघात यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी, पुरेशी बचत नसल्याने कर्ज घेण्याची जरूरी पडते. जिथे जिथे शक्य असेल तेथे कर्ज घेणे शक्यतो टाळावे. कर्जाऊ रक्कम घेतल्याने फेडण्याची जोखीम वाढत असल्याने आर्थिक जबाबदारी वाढते. बरेचदा बँका वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देतात, ती तारणासह अथवा तारण विरहितही असू शकतात. तारणासह घेतलेल्या कर्जासाठी मालमत्ता गहाण ठेवावी लागते. कर्ज फेडू शकलो नाही तर त्या मालमत्तेची विक्री केली जाते. उदा वाहन कर्ज, गृह कर्ज. या उलट काही कर्जे विनातारण दिली जातात जसे वैयक्तिक कर्ज. कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या कर्ज नेहमीच मान्यताप्राप्त, नोंदणीकृत धनकोकडून (बँक, बिगर बँकिंग अर्थसंस्था, पतपेढी) घ्यावं. अनोंदणीकृत व्यक्ती संस्था, खाजगी सावकार यांच्याकडून घेऊ नये. कर्जावरील व्याजाचा दर तपासून पाहावा. कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्याकडून ते घ्यावे. धनकोकडून व्याजाची आकारणी कशी केली जाणार ते समजून घ्यावे. ती दोन पद्धतीने केली जाते. सरळव्याज - यात मूळ कर्ज रकमेवर पूर्ण व्याज आकारले जाते तर दुसऱ्या पद्धतीत जसजशी मुद्दल कमी होईल त्याप्रमाणे कमी व्याज घेतले जाते. तुमच्या नियमित खर्चावर परिमाण न करता परतफेडीची क्षमतेनुसार कर्जफेडीचा हप्ता आणि कालावधी ठरवून घ्यावा. हा कालावधी जितका कमी तेवढे कमी व्याज द्यावे लागते तर कालावधी अधिक असेल तर व्याज अधिक द्यावे लागते. कर्ज घेण्यापूर्वी काही छुपे खर्च असतील तर ते किती आणि कोणते यांची माहिती करून घ्यावी उदा प्रक्रिया फी, हप्ता भरल्यास उशीर झाल्यास पडणारा दंड, मुदतपूर्व कर्ज फेडल्यास द्यावी लागणारी अधिकची रक्कम इ. कर्ज घेतल्यावर हे लक्षात ठेवा. अधिकचे व्याज आणि दंड टाळण्यासाठी कर्जाचे हप्ते नियमित भरा. जास्त पैसे उपलब्ध असल्यास कर्ज मुद्दल अंशतः अथवा पूर्णपणे मुदतीपूर्वी फेडल्यास पडणारा दंड लक्षात ठेवून ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कर्ज खात्याचा नियमित आढावा घ्या. वेगवेगळी कर्जे घेण्यापूर्वी त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा आपल्यावर पडू नये म्हणून आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करा. विमा - अनपेक्षित संकटापासून संरक्षण. आपण आणि आपल्या कुटुंबावर काही संकटे येऊ शकतात जसे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, प्रदीर्घ आजारपण, चोरी, आग. याचा मोठा आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो विम्यामुळे त्याची आर्थिक भरपाई होत असल्याने तीव्रता थोडी कमी होते. विविध विमा प्रकार जीवन विमा - या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा कुटूंबियांना एकरकमी भरपाई मिळत असल्याने आर्थिक आधार मिळतो. अपघात विमा - या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीस अपघात झाला असता आर्थिक स्वरूपात एकरकमी अथवा टप्याटप्याने मदत मिळते आरोग्य विमा - यामुळे अपघात झाल्यास अथवा आजारी पडल्यास होणाऱ्या खर्चाची पूर्तता होते. सर्वसाधारण विमा - जसे की वाहन विमा, प्रवास विमा, निवृत्ती विमा, मालमत्ता विमा या विम्यामुळे त्याच्याशी संबंधित मालमत्तेतील आर्थिक जोखमीची तीव्रता कमी होते. आपली नेमकी गरज ओळखून यापैकी जीवन विमा, अपघात विमा, आरोग्य विमा अथवा सर्वसाधारण विम्याची निवड करावी. यासाठी आपल्याला वर्गणी द्यावी लागते ती मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने भरता येते यातील काही विमा प्रकार विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी वर्गणी भरूनही उपलब्ध आहेत. विश्वासार्ह एजंट कडून याविषयी अधिकृत सविस्तर माहिती मिळवता येईल. तुमच्या गरजेनुसार ध्येय निश्चितीची मोजणी करणारे विमा योजनांची गणना करणारे गणक उपलब्ध आहेत. मालमत्ता नियोजन मालमत्तेमध्ये तुमचे घर, बचत, विमा, गुंतवणूक, ताबेकबजात असलेल्या गोष्टींचा समावेश होतो. मालमत्ता नियोजन म्हणजे तुमच्या पश्चात मालमत्ता किती आणि कशी विभागणी जावी यासंबंधीची निश्चित रचना. मालमत्ता नियोजनाची गरज - मालमत्ता सुलभतेने वारसांकडे हस्तांतरित व्हावी म्हणजे त्यांना खरीखुरी गरज असताना त्याचा उपयोग होईल. मालमत्तेची वाटणी तुमच्या इच्छेनुसार आणि विनातंटा विभागली जाईल.मालमत्ता नियोजनात तुमची मालमत्ता प्रियजन, कुटूंबीय यांच्यामध्ये विवाद न होता कशी वाटली जावी याचा विचार केला जातो. मालमत्ता नियोजन करण्यासाठी उपयुक्त गोष्टी खालीलप्रमाणे- इच्छापत्र - तुमच्या पश्चात मालमत्तेची वाटणी कशी व्हावी याची नोंद असते. जर मुले लहान असतील तर त्यांचा सांभाळ कोणी करावा याचा त्यात उल्लेख केलेला असतो. काही वेळेस इच्छापत्राची सत्यता सिध्द करण्यासाठी न्यायालयाकडून प्रमाणपत्र मिळवावे लागते त्यास प्रोबेट म्हणतात. अधिकारपत्र - यात मालमत्तेची देखभाल तुमच्या अनुपस्थितीत कुणी करावी, यासाठी विश्वासू व्यक्तीची नेमणूक करून त्यास कायदेशीर अधिकार दिले जातात. आढावा आणि पुनर्विचार- बदलती परिस्थिती आणि कायद्यातील बदल यांचा विचार करून इच्छापत्र आणि अधिकारपत्र यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. यासाठी निष्णात विधिज्ञाची मदत घेता येईल.






