एकीकडे एका बेस्ट कामगाराने कुलाबा आगाराबाहेर गळ्यात पाटी अडकवून आंदोलन केले. त्यातून सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची होणारी फरफट दुनियासमोर आली. मागील काही दिवसांपासून बेस्टमधल्या घडामोडींना प्रचंड वेग आला. सारेचजण जणू आपणच बेस्टचे तारणकरता या अभिर्भावात येऊ लागल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
एकीकडे बेस्ट मुख्यालयाबाहेर केलेले आंदोलन नंतर त्याच कर्मचाऱ्याने गळ्यात फलक लटकवून हुतात्मा चौकात केलेले आंदोलन यामुळे बेस्टमधील निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची व्यथा निदान जगासमोर येईल हाच एकमेव उद्देश होता, तर दुसरीकडे शिवसेना उबाठाशी एकनिष्ठ असलेले बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी उबाठाला केलेला रामराम व त्यानंतर उबाठावरच केलेली टीका यामुळे बेस्टमधील वातावरण ढवळून निघाले, तर दुसरीकडे त्याच वेळेला बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी त्यांच्या केनेडी ब्रिज कार्यालयात सोमवारपासून सुरू केलेले उपोषण अखेर शुक्रवारी मध्यरात्री माघार घ्यावे लागले तर आता नारायण राणे समर्थप्रणीत बेस्ट कामगार संघटना यांनी बेस्ट महाव्यवस्थापक यांची परवा बुधवारी होणारी भेट व आपल्या मागण्या लवकरच पूर्ण न झाल्यास दिलेली आंदोलनाची हाक हे पाहता सध्या तरी एकच गोष्ट जाणवते की, कर्मचाऱ्यांमध्ये आता कुठेतरी एक आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र आज तरी सर्वांना मिळत आहेत फक्त आश्वासनं आणि आश्वासनं.
बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार १० नोव्हेंबरपासून बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव हे आपल्या कार्यालयात बेमुदत उपोषणास बसले होते त्यांच्याही त्याच मागण्या होत्या बेस्ट उपक्रम आणि स्वमालकीच्या ३ हजार ३३३७ बस गाड्या कायमस्वरूपी राखाव्यात बेस्ट उपक्रमात सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम त्यांना तातडीने देण्यात यावी. बेस्ट कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतन करार तातडीने करण्यात यावा या व इतर मागण्या पूर्ण करून घेण्याकरता ते सोमवारपासून उपोषणास बसले होते अखेर त्यांना मिळाले शुक्रवारी फक्त आश्वासन आणि आश्वासन या दरम्यान बेस्ट उपक्रमांकडून दोन ते तीन वेळेला महाव्यवस्थापकांच्या वतीने त्यांच्यासमोर लवकरच आपण यावर मुख्यमंत्र्यांशी बोलू व तोडगा काढू असे आश्वासन मिळाले मात्र शुक्रवारी त्यांना आपले उपोषण थांबवावे लागले मात्र या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली गेल्या नऊ दिवसांच्या संपात शशांक राव यांनी जे केलं त्याचीच पुनरावृत्ती या चार दिवसांच्या आंदोलनानंतर केली असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे . मागील संप काळात नऊ दिवस कामगारांनी मोठ्या आशेने शशांक राव यांना सर्व कायम कामगारांनी मोठ्या आशेनी साथ दिलेली होती, पण त्यावेळी त्यांनी बेस्ट उपक्रमाबरोबर करार MOU करून मोठी निराशा कामगारांच्या पदरी पाडली. समान काम समान वेतन हा जुनियर ग्रेडच्या मुद्द्यावर कोर्टानेच दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याव्यतिरिक्त कोणतेही भरीव काम त्यांनी कामगारांच्या पदरी पाडले नाही उलट आपल्या कार्यकर्त्याच्या आणि युनियनच्या फायद्यासाठी मात्र बराच फायदा करून घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
नेतृत्वातील अभावामुळे झालेल्या MOU मधील बाबींची पूर्तता राव यांना करता आली नाही. याउलट उबाठाच्या सत्ता काळात मात्र खासगी बसेस मात्र आपल्या माथी मारण्यात आल्या. बसचे भाडे पाच रुपये करण्याची सूचना गरज नसताना युनियन नेते म्हणून शशांक राव यांनी केली त्याची परिणीती म्हणून बेस्ट अजून तोट्यात जाऊन वर्षागणिक आर्थिक तूट वाढत गेली. उबाठावर विश्वास ठेऊन विलिनीकरणाच्या मुद्यावर त्यांनी आपला संप तोडला. पुढे त्याचे सर्व परिणाम बेस्टला भोगावे लागले. आज पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झालेली दिसते आहे. शशांक राव यांनी कोणत्याही इतर कामगार युनियन सोबत चर्चा न करता घेतलेल्या निर्णयाला कामगारांच्या भल्यासाठी बेस्टमध्ये फक्त दोन वर्षांपूर्वी बेस्टच्या राजकारणात प्रवेश झालेल्या व बेस्टचे सर्व राजकारण ढवळून काढून कोणतेही आंदोलन न करता कामगारांना न्याय मिळवून देऊन कामगारांच्या हृदयावर आरूढ झालेले आमदार प्रसाद लाड यांनी देखील कामगारांच्या भल्यासाठी निस्वार्थीपणे राव यांना पाठिंबा दिला. तसेच इतर संघटनांनी म्हणजे सुनील गणाचार्य यांच्या संघटनेनेदेखील (भाजपप्रणीत) पाठिंबा दिला. एवढे होऊन देखील कोणालाही सोबत न घेता शशांक राव हे बेस्ट प्रशासनासोबत चर्चेला गेले आणि त्यांना गुंडाळण्यात बेस्ट प्रशासन यशस्वी झाले आहे. बेस्टच्या कायम कामगारांच्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या व कंत्राटी कामगारांच्या कोणत्याही मुद्याबद्दल कोणताही निर्णायक निर्णय पदरी न पाडता फक्त आमदार प्रसाद लाड यांच्या बैठकीत निवृत्त कामगारांच्या क्वॉर्टर्सचा मुद्दा निकाली निघाला होता. त्या मुद्याला ठळक मुद्दा बनवून, इतर विषयावर गेल्या पाच दिवसांच्या संपानंतर दर आठवड्याला बैठका घेऊन चर्चा करण्याचा निर्णय पुनःश्च पदरी पाडून घेतला आहे. निदान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठ टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय जरी पदरात पाडून घेतला असता, तर आज संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी व कायमस्वरूपी कर्मचारी राव यांच्या पाठीशी उभे राहिले असते. कारण आज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जगणे मुश्कील होऊन बसले आहे.
निदान आठ टक्के व्याजाने त्यांचा घर खर्च तरी भागला असता मात्र युद्धात जिंकले व तहात हरले अशी अवस्था तरी शशांक राव यांची झाली नसती. तर दुसरीकडे ५१ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले व बेस्ट कामगार सनेचे नेतृत्व करणारे सुहास सामंत यांनी उभाठाला राम राम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ते करताच त्यांनी उबाठावरही मोठी टीका केली निवडणूक हरलो म्हणून माझा बळी दिला. मुलाचे निधन झाले असताना माझ्या पदावर इतरांची नेमणूक केली, अशी टीका करताना ५१ वर्षे मातोश्रीसोबत प्रामाणिक राहिलो. ३१ वर्ष बेस्ट कामगार सेनेची धुरा वाहिली. माझी ५१ वर्षांची कारकीर्द एका क्षणात शून्य झाली. माझे दुःख मी पक्षश्रेष्ठ समोर मांडले होते इतरांची नेमणूक करताना तुम्ही महिनाभर तरी थांबू शकला असतात कारण त्यावेळेस माझ्या मुलाचे निधन झाले होते. मात्र दुसऱ्यांच्या भावनांशी किती खेळायचे. दुसऱ्यांच्या भावनांची कदर नेत्याला जर नसेल, तर त्यांची कदर कोणी आणि का करायची? अशा कडव्या शब्दात तीव्र भावना मांडत त्यांनी उबाठा यांना जय महाराष्ट्र केला. सुहास सामंत यांच्याकडे ठाकरे गटाचे उपनेते पद होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे . त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुहास सामंत यांची साथ सोडल्यामुळे उबाठाला मोठा धक्का मानला जात आहे.
- अल्पेश म्हात्रे






