स्थानिक स्वराज्यसंस्थेची ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची जशी त्याच्या अस्तित्वाची आहे. तशी ही निवडणूक कार्यकर्त्याच्या राजकीय भविष्याचीही आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांची नगरसेवक होण्याची सुप्त इच्छा असते. सोबतचे कार्यकर्ते मित्रही कधी-कधी खरोखरच मनापासून मित्रत्वाच्या नात्याने मित्राने निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्या कार्यकर्त्याच्या निवडणूकीपूर्वी आणि नंतरही पाठीशी उभे राहतात; परंतु कधी-कधी सोबतच्या कार्यकर्त्याला ‘बाद’ करण्यासाठीही निवडणूक लढविण्याची हवा भरतात... महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर मधल्या पाच-सात वर्षांनंतर या स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुका होत असल्याने साहजिकच इच्छुकांची संख्या वाढतीच असणार यात शंका नाही. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकारण जोरात आहे. एकीकडे पावसाने गेल्या आठवडाभरात विश्रांती घेतली आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर हवामानात गारवा निर्माण झाला आहे. थंडीला सुरुवात झाली आहे. कोकणातील ही थंडी कोकणातील फळफळांच्या उत्पादनासाठी आवश्यकच आहे. आंबा, काजू बागायतीत पालवी जाऊन झाडांवर मोहोराचे धुमारे दिसू लागले आहेत. एकीकडे थंडीच वातावरण कोकणात असताना कोकणातील राजकीय वातावरण मात्र काहीसे नरम-गरम आहे. बिहारच्या निवडणूक निकालाची उत्सुकता देशभरात होती तशी ती जगभराच्या ‘गजाली’मध्ये रमणाऱ्या कोकणी माणसालाही होती. नितीशकुमारांना जमतला की नाय. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोराचा काय झाला ता बघीतलास काय, या अशा गावगजालीने या थंडीच्या वातावरणात चाय-भजी खाताना कोकणातील टपरीवर याच गजाली ऐकायला मिळतात. याचबरोबर या चहा टपरीवर स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुकीतही काय होईल कशी चुरस होईल याचे गंमतीदार किस्सेही या गजालीच्या चर्चेत असतात.
कोकणातील चारही जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. मधल्या काही कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत. म्हणजे गेल्या पाच-दहा वर्षांतील नगरसेवक, पक्षांचे पदाधिकारी आणि गेल्या ५ वर्षांत प्रत्येक पक्षातील सक्रिय असलेले कार्यकर्ते यातल्या प्रत्येकालाच स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकीला सामोरे जात नगरपंचायत, नगरपालिकेत पदाधिकारी व्हाव अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच असते. अशी मनातली सुप्त इच्छा काही उघडपणे पक्षाकडे मागणी करून मांडतात. तर काही ठिकाणी काही इच्छूक माध्यमांचा आधार घेत ही सुप्त इच्छुक मार्ग मोकळा करतात. यामुळेच एकेका जागेवर अनेक इच्छुक अशीच काहीशी स्थिती आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनतापक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे गट यांची महायुती आणि राज्यातील विरोधी असलेली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट या पक्षांची महाविकास आघाडी या महायुतीत, तर इच्छुकांची संख्या फारच लांबलचक यादी आहे. जागा एक इच्छूक अनेक अशी स्थिती आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसपक्ष व शिवसेना उबाठा स्वतंत्र्यरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे.
महायुतीतही कोकणातील जवळपास सर्वच ठिकाणी एकापेक्षा इच्छुक अनेक असल्याने ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचा फॉर्म्युला अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. राजकारणात अनेकवेळा गुंतागुतीचे प्रश्न चर्चा आणि संवादातून सोडविले जाऊ शकतात. नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत कोणाला उभं राहा म्हणायच आणि कोणाला थांबवायच हा खरं तर गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झालेला असतो. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्व निवडणुका या ‘कार्यकर्त्यां’च्या निवडणुका आहेत. यामुळे सर्वच पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला या स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकीत आपणाला संधी मिळावी असं वाटत असत. या अशा संधीची सर्वसामान्य कार्यकर्ता नेहमी वाटच पाहत असतो. प्रत्येक कार्यकर्ता एखाद्या वॉर्डमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभागात पाच-दहा वर्षे काम करत असतात. जेव्हा एखाद्या प्रभागात पाच-दहा वर्षे काम करत राहिल्यावर लोकांशी कायम ‘टच’मध्ये राहिल्यावर त्या कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची मानसिकता होऊन जाते; परंतु जेव्हा तो प्रभाग आरक्षणात राखीव प्रभाग म्हणून घोषित होतो. तेव्हा तो कार्यकर्ता कोलमडून जातो. याचं कारण त्या कार्यकर्त्याला पाच वर्षे थांबाव लागणार असत. पाच वर्षांच्या वेटिंग पिरियडमध्ये बरेच राजकीय संदर्भ बदललेले असतात. आजचा राजकारण हे अळवा वरच्या पाण्यासारखा आहे. आजचे कोणतेही संदर्भ उद्याच्या राजकारणाला लागू होतील असं ठरवणं आणि सांगणं सर्वांनाच अवघड आहेत. राजकीय संदर्भ सध्या तर नेहमीच बदलत असतात. यामुळेच अस्थिरतेच्या सावटाखालच सध्याच राजकारणात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता स्वत:च अस्तित्व शोधण्याचा आणि ते टिकवण्याचा प्रत्येकाचा त्याच्या-त्याच्या पातळीवर प्रयत्न होत असतात. स्थानिक स्वराज्यसंस्थेची ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची जशी त्याच्या अस्तित्वाची आहे. तशी ही निवडणूक कार्यकर्त्याच्या राजकीय भविष्याचीही आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांची नगरसेवक होण्याची सुप्त इच्छा असते. सोबतचे कार्यकर्ते मित्रही कधी-कधी खरोखरच मनापासून मित्रत्वाच्या नात्याने मित्राने निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीपूर्वी, आणि नंतरही पाठीशी उभे राहतात; परंतु कधी-कधी सोबतच्या कार्यकर्त्याला ‘बाद’ करण्यासाठीही निवडणूक लढविण्याची हवा भरतात. आणि याच हवेने भरलेला तो कार्यकर्ता निवडणुकीत उभा राहतो आणि ज्यांनी त्याला उभं रहाण्यासाठी प्रवृत्त करतात तेच जेव्हा सोबत नाहीत हे त्याला कळतं तेव्हा त्या कार्यकर्त्याचा ‘अभिमन्यू’ झालेला असतो. त्यामुळे या स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकीत जशी प्रत्येक पक्षाला आपण कुठे आहोत हे तपासण्याची आणि कार्यकर्त्यालाही आपला राजयोग प्रबळ आहे का, हे पाहण्याची निवडणूक ही एक संधी आहे. पाहायचय पुढे-पुढे काय होतं ते...
- संतोष वायंगणकर






