महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाने आपले स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीमध्ये असलेल्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडली असून, महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राजकीय पक्षातील उमेदवारांकडून सुद्धा स्वतंत्रपणे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
पालघर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कैलास म्हात्रे, यांनी उमेदवारी दाखल केली आहे, तर शिवसेनेकडून उत्तम घरत यांनी उमेदवारी दाखल केल्याने, महायुतीमधील दोन राजकीय पक्षातील पदाधिकारी या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाकडून उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आले आहेत. डहाणूमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गट, आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. परिणामी पालघर जिल्ह्यात नगरपरिषद , नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक वातावरणानुसार हात मिळवणी केलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांचे मोठे प्राबल्य आहे आणि हे प्रमुख दोन पक्षाचे एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे. नामांकन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पालघर शहरातील प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह, ३० नगरसेवक पदांसाठी नामांकन दाखल करण्याकरिता सोमवारी विविध पक्षांकडून, राजकीय संघटनांकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी करण्यात आली. राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले असून, सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १२ आणि नगरसेवक पदासाठी १७२ अर्ज दाखल झाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा, बाबाजी काठोले, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी सभापती पंकज कोरे त्याचबरोबर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे उत्तम घरत यांच्यासाठी शिवसेना नेते व माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार विलास तरे तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर तालुका अध्यक्ष संदेश पाटील यांनी पक्षाची उमेदवारी निश्चित केली.नगरसेवकाच्या १७ जागांसाठी १०१ उमेदवार रिंगणात
वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होत असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवारांनी, तर १७ नगरसेवकांच्या जागांसाठी १०१ उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी निकिता गंधे (उबाठा शिवसेना), हेमांगी पाटील (शिवसेना), ज्योती आघाव (बहुजन भारत पार्टी), रिमा गंधे (भाजप), रंजिता पाटील, रिद्धी भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्योती आघाव (अपक्ष), शुभांगी जाधव (अपक्ष), निकिता धानवा(माकप), रंजिता पाटील (अपक्ष)अशा दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे या ठिकाणीही भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगवेगळे लढत आहेत. यावेळी उमेदवारांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेते रवींद्र फाटक, प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, भरत राजपूत, निलेश सांबरे, तर भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, उबाठा शिवसेनेचे निलेश गंधे उपस्थित होते.





