मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच होणार होता; मात्र काही कारणांमुळे पुढे ढकलून आता १८ नोव्हेंबरला तो प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुरंधरची कथा मोठी आणि गुंतागुंतीची आहे. रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेचा प्रवास हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे, मात्र इतर कलाकारांच्याही भूमिका कथेत महत्त्वाच्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रत्येक दृश्य प्रभावी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे असावे, यावर विशेष भर दिला आहे.
सध्या धुरंधरचा अंतिम रनटाईम ३ तासांपेक्षा अधिक आहे, अंदाजे ३ तास ५ मिनिटे. अंतिम कालावधी आदित्य धर, Jio Studios आणि B62 Studios यांच्या कडून पुढील १० दिवसांत निश्चित केला जाईल.” लांबी आणखी कमी होते की अशीच कायम राहते, हे लवकरच स्पष्ट होईल.
जर हा कालावधी कायम ठेवला गेला, तर ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट ठरेल. यापूर्वी दिल धडकने दो (२०१५) हा त्याचा सर्वात लांब चित्रपट होता, ज्याचा कालावधी २ तास ५१ मिनिटे होता. त्यानंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२३) – २ तास ४८ मिनिटे, ८३ (२०२१) आणि पद्मावत (२०१८) – प्रत्येकी २ तास ४३ मिनिटे. तर रणवीरचा सर्वात कमी लांबीचा चित्रपट किल दिल (२०१४) हा असून त्याचा रनटाईम फक्त १ तास ५७ मिनिटे होता.
रणवीर सिंहसोबत धुरंधरमध्ये संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन झळकणार आहेत. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला संपूर्ण टीम उपस्थित राहणार असून, संजय आणि अक्षय यांचा यात समावेश नसणार आहे.






