Monday, November 17, 2025

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-देवा’ फुटबॉल प्रतिभा विकास उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे गावागावातील फुटबॉलपटूंना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य कराराला स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी नाहर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सुखराज नाहर यांनी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनला एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. महत्त्वाकांक्षी ‘महा-देवा’ उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून टायगर श्रॉफ यांनी पाच वर्षांसाठी या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्यास सहमती दर्शविली आहे. राज्यातील मुला-मुलींत असलेल्या फुटबॉल प्रतिभेची ओळख करून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शिक्षण आणि परदेशातील संधी उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. डब्लूआयएफएच्या स्काऊटिंग नेटवर्कद्वारे ३० मुले आणि ३० मुलींची निवड करून त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाशी जागतिक दर्जाचे फलंदाज लिओनेल मेस्सी जोडले जाण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले. त्यामुळे ‘महा-देवा’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसारासाठी डिजिटल मोहीमा, जनजागृती कार्यक्रम आणि सार्वजनिक उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व प्रचार सामग्री टायगर श्रॉफ यांच्या मंजुरीनंतरच प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या उपक्रमामुळे राज्यातील फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा मिळेल आणि तरुण खेळाडूंना मोठ्या संधी, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment