Monday, November 17, 2025

महायुतीची शक्यता तपासा, पण मित्रपक्षांशी लढाई नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक नेत्यांना आवाहन

महायुतीची शक्यता तपासा, पण मित्रपक्षांशी लढाई नको, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्थानिक नेत्यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या नव्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिथे जमेल तिथे महायुती करण्याचा प्रयत्न करा, पण काही ठिकाणी महायुती न झाल्यास समोरचे पक्ष विरोधक नसून मित्रपक्ष आहेत, हे लक्षात ठेवूनच निवडणूक लढा, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही पातळ्यांवर भाजप भक्कम कामगिरी करेल आणि पालिका निवडणुकीत विरोधकांचा पराभव निश्चित आहे; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“विरोधक जमिनीवर नाहीत, म्हणूनच त्यांची अवस्था बिकट”

विरोधी पक्ष जनतेत जात नाहीत आणि मतचोरी किंवा ईव्हीएमसारखे मुद्दे उचलून गोंधळ करतात; पण कोर्टात किंवा निवडणूक आयोगासमोर एकही ठोस पुरावा देऊ शकत नाहीत. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांत त्यांची अशीच पडझड होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेत पूर्वीच्या सरकारने अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आल्यावर सभांना प्रतिसाद नव्हता, लोकांचा विश्वास गमावल्यामुळेच लोक त्यांच्याकडे जात नाहीत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर वेगाने औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत असून टोयोटा, किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू यांसारख्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक येत आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात हे शहर देशाचे ‘कॅपिटल’ ठरणार असून हजारो रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्ग, एअरपोर्टसाठी मंजूर ७४० कोटी, तसेच मनमाड–छत्रपती संभाजीनगर मार्गाच्या प्रगतीबाबतही त्यांनी माहिती दिली.

नवीन कार्यालय उभारण्यात मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या प्रयत्नांचा फडणवीसांनी विशेष उल्लेख केला. जमीन मिळवण्यापासून सर्व परवानग्या घेऊन कार्यालय उभारण्यापर्यंत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. अनिल मकरिये यांनी दोन वर्षे दिलेल्या वेळेबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.

नवीन कार्यालयात केबिन्स, मोठे सभागृह, बोर्ड रूम, वॉर रूम, डायनिंग हॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, इमारत नव्हे तर त्या कार्यालयातून लोकांच्या समस्या किती सुटतात यावर पक्षाची ताकद अवलंबून असते, अशी आठवण फडणवीसांनी पदाधिकार्‍यांना करून दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा