Monday, November 17, 2025

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगरमध्ये भाजपचा एकहाती विजय! १७ पैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून

अनगर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने सर्व १७ नगरसेवक पदे बिनविरोध जिंकत प्रभावी ताकद दाखवली; परंतु नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित वळण आल्याने या परिसरातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपच्या १७ पैकी १७ उमेदवारांनी कोणतीही स्पर्धा नसताना विजय मिळवला असून अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच करणार आहेत. या विजयानंतर भाजप नेते राजन पाटील यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जल्लोष केला.

नगराध्यक्षपदासाठी मात्र थेट सामना रंगणार आहे. भाजपच्या प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी या पदासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे अनगरसोबतच सोलापूर जिल्ह्यात या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीतही याच दिवशी मतदान होईल. मतमोजणी दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार असून निकाल जाहीर होतील.

अनगर नगरपंचायतीचा आज अंतिम निकाल स्पष्ट झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती; मात्र इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा उमेदवार पुढे न आल्याने भाजपचे सर्व १७ उमेदवार निवडून आले. हे सर्व उमेदवार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

नगराध्यक्ष पदही बिनविरोध व्हावे, अशी भाजपची इच्छा होती. राजन पाटील यांनी यासाठी सर्व तयारीही केली होती. पण शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला थिटे यांनी पहाटेच नगरपंचायत कार्यालयात जाऊन आपले नामांकन दाखल केले. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याचा डाव फसला असून आता दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे.

Comments
Add Comment