मोखाडा : सूर्याची किरण पडताच पक्षाच्या किलबिलाटाने रमणीय होणारी पहाट आता हरवत चालली आहे. गवताळ डोंगराळ भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढते शहरीकरण नवनवीन प्रकल्पांच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड, वणवे, शिकार यामुळे मागील काही वर्षांपूर्वी सहज आढळून येणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत.
ठाणे पालघर जिल्ह्यात अंदाजे २०० ते २७४ प्रजाती पक्ष्यांच्या आढळतात यामधील भारतीय पिटा, पाईड हेरियर, वनपिंगळा, हरियाल, युरेशियन ग्रीफन गिधाड, निलपंख या पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या असून त्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची मागणी पक्षी सप्ताह निमित्ताने पक्षीप्रेमीकडून केली जात आहे.
तानसा अभयारण्य हे ठाणे पालघर जिल्ह्याचा अविभाज्य भाग असून यामध्ये रेडिंटेड बुलबुल, एशोप्रिनिया, टेलर बर्ड, बी इटर, क्लिप शॅलो, वेगटेल, ससाने, गरुड, रान चिमण्या, नीलपोपट, नीलपंख महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल असे विविध प्रकारचे पक्षी तथा अनेक घुबडांच्या जाती यामध्ये ठिपके वाला पिंगळा, मोल्टेड घुबड,मासेमार घुबड, ईगल घुबड असे निशाचर पक्षीही आढळतात.या सर्व पक्षांचे संवर्धन होणे आवश्यक असून याबाबत उपाययोजना गरजेच्या आहेत.






