महेश देशपांडे
अलीकडच्या काळात समोर आलेली पहिली दखलपात्र बातमी म्हणजे डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये काळजी घेण्याची गरज ‘सेबी’तर्फे प्रतिपादीत करण्यात आली. दुसरी बातमी म्हणजे मोबाइलवर बोलणे महागणार असल्याची माहिती समोर आली, तर तिसरी बातमी म्हणजे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले. या तीनही बातम्यांनी जनसामान्यांना सावध केले आहे.
सरत्या आठवड्यामध्ये तीन लक्षवेधी अर्थवार्ता समोर आल्या. सामान्यजनांसाठी त्या विशेष महत्त्वाच्या ठरल्या. पहिली म्हणजे डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीत काळजी घेण्याची गरज ‘सेबी’तर्फे प्रतिपादीत करण्यात आली. दुसरी बातमी म्हणजे मोबाइलवर बोलणे महागणार असल्याची माहिती समोर आली. तर तिसरी बातमी म्हणजे परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारावरचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले. सोन्यातील गुंतवणूक काळानुसार बदलत आहे. दागिने, नाणी किंवा बार खरेदी तसेच डिजिटल गुंतवणूक वाढत आहे. तथापि, यामध्ये फसवणुकीचा धोका आहे. ‘सेबी’ने दिलेल्या एका अहवालामध्ये म्हटले आहे की, डिजिटल सोने आणि उत्पादने सिक्युरिटीज मार्केट फ्रेमवर्कमध्ये येत नाहीत. ते सेबी नोंदणीकृत गोल्ड ट्रेडेड फंड’(ईटीएफ) आणि इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांपेक्षा वेगळे आहेत. ‘सेबी’ने इशारा दिला आहे की, अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सध्या डिजिटल सोने किंवा ई गोल्डमध्ये गुंतवणूक करत आहेत; परंतु त्यांच्या नियमनाच्या अभावामुळे त्यामध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. डिजिटल सोने ‘सेबी’च्या नियमनाच्या अधीन नसल्याने डिजिटल सोने किंवा ई गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास सेबी कोणतेही संरक्षण किंवा मदत प्रदान करणार नाही.
डिजिटल सोन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सोने खरेदी करता किंवा विकता येते. मोबाइल ॲप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून डिजिटल सोन्याची गुंतवणूक सहज करता येते. आजकाल त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे. या माध्यमामध्ये एक रुपयापासून गुंतवणूक सुरू करता येते. ही खरेदी किंवा विक्री बाजारभावानुसार करता येते. तथापि, अनेक डिजिटल सोने प्लॅटफॉर्म सेबी-नियमित नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्यास ‘सेबी’कडून कोणतेही संरक्षण मिळणार नाही. ‘सेबी’ म्हणते, की सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर ‘सेबी’च्या नियमांमध्ये येणाऱ्या आणि कोणताही धोका नसलेल्या अनेक अस्तित्वात आहेत. ‘सेबी’ नोंदणीकृत मध्यस्थांद्वारे ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड’(गोल्ड ईटीएफ), इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (ईजीआर) आणि एक्स्चेंज ट्रेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह काँट्रॅक्टसमध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या तनिष्क, फोन पे, कॅरेटलेन, एमएमटीसी पीएएमपी, जॉय अलुक्कास आदित्य बिर्ला कॅपिटल आणि श्रीराम फायनान्ससारख्या अनेक कंपन्या डिजिटल सोने विकत आहेत. तथापि, यामध्ये जोखीम घटकदेखील आहेत. कारण ते ‘सेबी’ नियंत्रित नाहीत. तथापि, तनिष्क आणि एमएमटीसी त्यांच्या वेबसाइटवर दावा करतात, की ते ‘सेफगोल्ड ब्रँड’ अंतर्गत डिजिटल सोने देतात. २४ कॅरेट शुद्ध सोने खरेदी करण्याचा हा एक विश्वासार्ह मार्ग आहे. गुंतवणूकदार फक्त दहा रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात.
दरम्यान, मोबाईल वापरणे महाग होणार असल्याची बातमी आहे. कारण आता एअरटेल, जिओ आणि वोडाफोन मोठ्या कंपन्या ग्राहकांना महागाईत झटका देण्याच्या तयारीत आहेत. रिचार्ज आणि डेटाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइल यूजर्सच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लानची किंमत वाढवण्याची तयारी करत आहेत. हा बदल डिसेंबर २०२५पासून लागू होऊ शकतो. त्याचा परिणाम प्रीपेड आणि डेटा प्लॅन्सवर सर्वाधिक होऊ शकतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोठे कर्ज फेडण्यासाठी प्रति वापरकर्ता २०० रुपयांहून अधिक कमाई करणे आवश्यक आहे. मात्र सध्या ही कमाई सरासरी १८० ते १९५ रुपयांच्या दरम्यान आहे. एका अंदाजानुसार १९९ रुपयांचा प्लॅन २२२ रुपये, २९९ रुपयांचा २८ दिवस (दोन जीबी दर दिवस) चा प्लॅन, ३३०-३४५ रुपयांचा ८४ दिवसांचा दोन जीबी/दिवसाचा प्लॅन ९४९ रुपये ते ९९९ रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो.
या दरवाढीमुळे ग्राहकांना दीर्घकाळाचे प्लॅन्स घेताना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कंपन्यांनी सांगितले की, टेलिकॉम कंपन्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. या कंपन्यांकडून ‘फाईव्ह जी’ नेटवर्कच्या विस्तारासाठी मोठी गुंतवणूक सुरू आहे. त्यामुळे या कंपन्यांनी थेट दरवाढ न करता स्वस्त प्लॅन्स सेवेतून हळहळू बंद करण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान मोबाइल रिचार्ज प्लॅनची किंमत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिओ आपला आयपीओ येण्यापूर्वी १५ टक्के दरवाढ लागू करू शकते तर इतर कंपन्या दहा टक्के दरवाढ लागू करू शकतात. महागाईपासून वाचायचे असेल, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये दीर्घकालीन व्हॅलिडीटीचा प्लॅन रिचार्ज केल्यास ग्राहकांना आजच्या दरात पुढील अनेक महिन्यांची सेवा मिळू शकते. दीर्घकालीन डेटाचा वापर करत असल्यास वार्षिक वैधतेचा प्लॅन रिचार्ज करणे फायद्याचे होऊ शकते. बीएसएनएल सध्या या दरवाढीपासून लांब आहे.
आता एक दखलपात्र बातमी. जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये अनियमित उन्हाळा, मुसळधार पाऊस आणि जीएसटी बदलांमुळे ग्राहकोपयोगी उत्पादक कंपन्यांची कामगिरी संमिश्र राहिली. असे असूनही जगातील अनेक मोठ्या ग्राहकोपयोगी उत्पादक कंपन्या भारताबद्दल सकारात्मक आहेत. परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेवरील विश्वास कायम आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारपेठेत तेजी येऊ शकते.
सुमारे एक डझन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते भारतात गुंतवणूक करत राहतील, कारण खपाची परिस्थिती स्थिर आहे आणि मागणी अपेक्षेपेक्षा वेगाने वाढत आहे. मोंडेलेझ, युनिलिव्हर, कार्ल्सबर्ग, कोलगेट-पामोलिव्ह, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, ॲपल, पापा जॉन्स, डियाजियो, कोका-कोला, पेप्सिको आणि लेव्ही स्ट्रॉसच्या प्रमुखांनी सांगितले, की भारत त्यांच्यासाठी वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. ‘मोंडेलेझ’चे ‘सीईओ’ डर्क व्हॅन डी पुट म्हणाले, की भारतात किरकोळ दबाव असले, तरी एकूण परिस्थिती चांगली आहे.
जीएसटीशी संबंधित समस्या असूनही सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये भारतात कंपनीची विक्री मध्यम प्रमाणात वाढली. ‘युनिलिव्हर’चे ‘सीईओ’ फर्नांडो फर्नांडिस म्हणाले, की उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये कंपनीची स्थिती सुधारत आहे आणि मध्यम कालावधीत भारत चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी सांगितले, की जीएसटी सुधारणांचा थोडासा परिणाम झाला आहे; परंतु त्यांच्या ४० टक्के उत्पादनांच्या किंमती सुमारे दहा टक्के कमी झाल्याने मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.हवामानातील बदल आणि मॉन्सूनच्या लवकर आगमनामुळे थंड पेये, एअर-कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरसारख्या उन्हाळी उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला. जीएसटी संक्रमण प्रक्रियेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विक्रीवर परिणाम झाला. २२ सप्टेंबरपासून अनेक ग्राहक उत्पादनांवर जीएसटी कमी करण्यात आला. कोका-कोला, पेप्सिको आणि कार्ल्सबर्ग यांनी सुरुवातीला परिणाम नोंदवला होता; परंतु आता त्यांच्यात सुधारणा दिसून येत आहे. ‘कार्ल्सबर्ग’च्या मुख्य वित्तीय अधिकारी उलरिका फर्न यांनी सांगितले, की गेल्या तिमाहीमध्ये भारतातील बिअर बाजारावर मुसळधार पावसाचा परिणाम झाला होता; परंतु सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढ अनुभवायला मिळाली.
बाजारातील वाटा वाढला असला, तरी सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या विक्रीत एक टक्का घट झाली. ‘पेप्सिको’चे ‘सीईओ’ रॅमन एल. लागुआर्टा म्हणाले, की जागतिक स्तरावर ग्राहकांवर दबाव आहे; परंतु भारतातील परिस्थिती चांगली आहे. बदलते हवामान आणि स्पर्धेमुळे काही परिणाम होतील असे त्यांनी सांगितले; परंतु या श्रेणीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, ग्रामीण बाजारपेठा शहरी बाजारपेठांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. कंपन्या शहरी बाजारपेठांमध्ये प्रीमियम उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहेत. ‘कोलगेट-पामोलिव्ह’चे ‘सीईओ’ नोएल वॉलेस म्हणाले, की शहरांमध्ये मागणी कमी होत आहे, तर ग्रामीण भागातील परिस्थिती स्थिर आहे. त्यांनी पुढे सांगितले, की शहरी बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी कंपनी जास्त किमतीच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या कारखाने आणि दुकानांमध्ये गुंतवणूक करत आहेत. ‘ॲपल’चे सीईओ टिम कुक म्हणाले, की सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने भारतात आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवला आणि नवीन दुकाने उघडली.






