मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कल्पना टॉकीज (कुर्ला) ते पंखे शाह दर्गा (घाटकोपर पश्चिम) असा साडेचार किलोमीटर अंतराचा हा उड्डाणपूल बांधला जाणार असून, प्रकल्पासाठी तब्बल 1365 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
उड्डाणपूल प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा ठरलेली नौदलाची जमीन अखेर सोडवण्यात आली आहे. पुलाचा एक किलोमीटरचा भाग नौदलाच्या हद्दीशेजारी येत असल्याने दोन वर्षे एनओसी मिळण्यात विलंब झाला. दरम्यान वारंवार पत्रव्यवहार करूनही उत्तर मिळत नव्हते, त्यामुळे प्रकल्पाचा पुढील खर्च, आराखडा आणि निविदा थांबल्या होत्या. नुकतेच नौदलाची ना-हरकत मिळताच व्हीजेटीआयने सर्वेक्षण पूर्ण केले आणि अहवालानंतर निविदा काढण्यात आल्या.
निविदा भरण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच काम करणारी कंपनी निश्चित केली जाणार आहे. उड्डाणपुलासाठी दर्जेदार साउंड बॅरिअर्स आणि सुरक्षात्मक पत्रे बसवले जातील, जेणेकरून नौदलाच्या हालचाली दिसणार नाहीत. उड्डाणपुलाची लांबी 4.5 किमी आणि रुंदी 15.50 मीटर असेल. हे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण होण्याची महापालिकेची अपेक्षा आहे.






