Saturday, November 15, 2025

आकाश निळे का दिसते?

आकाश निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील

सीता व नीता या दोघी बहिणी. त्यांना जसा अभ्यासात रस होता तशीच त्यांना वाचनाचीही भारी आवड होती. त्यामुळे सतत काही ना काही नवीन वाचनाचे पुस्तक त्या शाळेच्या ग्रंथालयातून आणून वाचायच्यात. विशेष म्हणजे त्यांचे आई-बाबा दोघेही या दोघींना अवांतर बोधप्रद, प्रेरणादायी व संस्कारक्षम पुस्तकांच्या वाचनासाठी नेहमी प्रोत्साहन द्यायचे. त्या दररोज नियमितपणे शाळेत जायच्या व शाळेतून संध्याकाळी घरी आल्याबरोबर प्रथम आपला गृहपाठ उरकून घ्यायच्या. नंतर आपले अवांतर वाचन करायच्या. ते झाल्यावर आपल्या प्राध्यापिका मावशीला विविध प्रश्न विचारून तिच्याकडून आपली जिज्ञासापूर्ती करून घ्यायच्या.

“मावशी! तू आम्हाला आज आकाशाच्या रंगाबद्दल माहिती सांगणार आहेस ना?” उत्सुकतेने सीताने विचारले. “सांग ना मावशी, लवकर! हे आकाश का दिसते निळसर?” नीता उतावीळपणे पटकन म्हणाली. “व्वा! तू तर जणू काही कवितेची ओळच जोडली गं नीता.” मावशी म्हणाली. “अगं मावशी, नीता आत्तापासून छान छान कविता करते.” सीता बोलली. “आणि तू काय करतेस?” मावशीने सीताला विचारले. “मी हिच्या कविता वाचते.” सीताने पटकन उत्तर दिले. “चांगल्या हजरजबाबी मुली आहेत गं माझ्या.” मावशी आनंदाने बोलली. “नुसती वाचतच नाही मावशी ही. तर कवितांना छान चाल लावून गोड आवाजात गातेसुद्धा.” नीताने सांगितले.

“खूपच छान. म्हणजे माझ्या लाडक्या मुलींजवळ, एकीजवळ लेखनाचा तर दुसरीजवळ गायनाचही गुण आहे तर!” मावशीने मुलींचे कौतुक केले. “जाऊ दे गं मावशी, तू आता आम्हाला पटकन माहिती सांग बरं.” आता सीता झटकन म्हणाली.

“सांगते! सांगते!” मावशी सांगू लागली, “तुम्ही आता शांत राहा. सगळ्या वैज्ञानिक संज्ञांच्या सुलभ स्पष्टीकरणासह मी तुम्हाला सोप्या भाषेत सारे काही समजावून सांगते. मी सांगितलेले तुम्ही नीट ऐका म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तसेही हे पुस्तक इतक्या सोप्या व रंजक भाषेत लिहिलेले आहे की तुम्हालाच काय कोणालाही हे पुस्तक वाचताना मुळीच कठीण वाटणार नाही, कंटाळा येणार नाही. पुस्तक वाचता वाचताच सगळ्या गोष्टी नीट समजतात. सर्व संकल्पना छानपणे कळतात. पण मी आता स्वत: येथे आलेलीच आहे, तर तुम्हाला आणखी जास्त स्पष्ट करून सांगते. तुमची बुद्धिमत्ता चांगलीच आहे याबद्दल काहीच शंका नाही. तरी तुम्ही ऐकलेले सारे लक्षात ठेवा नि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा तसेच समजाऊन सांगा. पटलं ना?”

“हो! हो! मावशी! आम्हाला एकदम मान्य आहे.” दोघीही एकसुरात म्हणाल्या. “बरे आपण विकिरणाच्या माहितीपासून सुरुवात करू,” असे म्हणत मावशी सांगू लागली.… “विकिरण म्हणजे वातावरणातील धुळीच्या कणांवरून सूर्यप्रकाशाचे चोहीकडे पसरणे. विकिरण झालेल्या प्रकाशामध्ये निळ्या व जांभळ्या रंगांच्या प्रकाशाची तीव्रता जास्त असते. जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी ही तांबड्या प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा जवळजवळ निम्मी असल्यामुळे, विकिरण झालेल्या प्रकाशामध्ये जांभळ्या प्रकाशाचे प्रतिशत प्रमाण हे तांबड्या प्रकाशापेक्षा जवळजवळ सोळा पटींने जास्त असते. म्हणून विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्याचे पुन्हा पुन्हा विकिरण झाल्यामुळे जांभळ्या रंगाची तीव्रता कमी कमी होत जाऊन तो वातावरणात नष्ट होतो व शेवटी सर्वात कमी तरंगलांबीचा निळा रंगच शिल्लक राहतो. तसेच प्रकाशात निळ्या रंगाचे प्रमाण जास्त असल्याने तो जास्त पसरतो. त्यामुळे आपणाला आकाश हे निळ्या रंगाचे दिसते.” मावशीने खुलासेवार सांगितले.

हे सांगत असताना मावशीला तहान लागली व ती पाणी पिण्यासाठी उठून गेली व तिकडेच आईसोबत गप्पा मारत बसली.

Comments
Add Comment