तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर
आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून विशेष क्षणचित्रे उलगडून दाखवली जातात. त्यातूनच नेटकेपणाने न घेतलेला कॅच, बॉलने घेतलेला स्विंग किंवा खेळाडूने सीमारेषेला केलेला - न केलेला स्पर्श याची अचूक माहिती मिळते. या दृष्टीने क्रिकेटमध्ये येत असलेले नवतंत्रज्ञान लक्षवेधी आहे. कुकाबुरा बॉलमधील नवतंत्राने या संदर्भातील नवा अध्याय लिहायला घेतला आहे.
क्रिकेट हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात असून कालौघात त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. एकीकडे खेळाची गती वाढली, तशीच प्रेक्षकांची अपेक्षा आणि निर्णायकतेबाबतची अचूकताही वाढली. या बदलत्या गरजांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर क्रिकेटमध्ये वाढू लागला. आजच्या घडीला, क्रिकेट सामन्यांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका इतकी महत्त्वाची झाली आहे की, त्याविना अचूक निर्णय, विश्लेषण किंवा प्रेक्षकांना उच्च दर्जाची अनुभूती देणे अशक्यप्राय झाले आहे. क्रिकेटमध्ये १९९० च्या दशकात तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला; परंतु त्याचा खरा प्रभाव २००० नंतर दिसून आला. सुरुवातीला हा बदल फक्त थोड्या प्रमाणावर रिप्ले दाखवणे, स्कोअरकार्ड इलेक्ट्रॉनिक करणे इतपत मर्यादित होता; परंतु टीव्ही प्रक्षेपण व्यावसायिक होत गेले, तसे डीआरएस, हॉक-आय, अल्ट्रा एज, बॉल ट्रॅकिंग यांसारख्या प्रगत प्रणाली क्रिकेटचा अविभाज्य भाग बनल्या. आता त्यापुढची पायरी म्हणजे कुकाबुरा स्मार्ट बॉल. आजचा क्रिकेट ‘डेटा-ड्रिव्हन’ झाले आहे. बॉलचा वेग, स्विंग, बाऊन्स, स्पिन हे सर्व डेटा रूपात संकलित करून विश्लेषण केले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘कुकाबुरा स्मार्ट बॉल’ हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान समोर आले आहे. या बॉलने क्रिकेटमध्ये अचूक मोजमाप, फिटनेस मोजणी आणि डेटा ॲनॅलिटिक्सला नव्या उंचीवर नेले आहे. हल्ली सामन्याप्रसंगी चढाओढ इतकी वाढते की, एक एक चेंडू आणि एक एक धाव निर्णायक ठरते. त्या संदर्भातील निर्णयात थोडीशी चूक झाली तरी चांगले अंपायरिंग झाले नाही किंवा पक्षपातीपणा झाल्याच्या तक्रारी चाहत्यांकडून सहज केल्या जातात.
खेळात कटुतेला स्थान नसावे आणि खेळीचे, नियमांचे चोख मूल्यमापन व्हावे या दृष्टीने काही नवी तंत्रे आकाराला येत असल्यास स्वागतच व्हायला हवे. त्या दृष्टीने पाहता कुकाबुरा स्मार्ट बॉल हे तंत्रज्ञानाने क्रिकेटच्या जगात टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणता येते. हे एक खास तंत्रज्ञान आहे. पारंपरिक खेळाला आधुनिक डेटा ॲनालिटिक्सची जोड देऊन या बॉलने खेळाडूंच्या प्रशिक्षणाची पद्धत, प्रेक्षकांचा सामना पाहण्याचा, रसग्रहण करण्याचा अनुभव आणि सामन्यांच्या निर्णयाचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची क्षमता दाखवली आहे. कुकाबुरा स्मार्ट बॉल हा एक विशेष बॉल आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सेन्सर टेक्नॉलॉजी वापरली आहे. पारंपरिक बॉलप्रमाणे दिसणारा हा बॉल आतून अत्यंत तंत्रसमृद्ध आणि बुद्धिमान आहे. या बॉलमध्ये स्मार्ट चिप्स आणि सेन्सर बसवलेले असतात, जे बॉलच्या प्रत्येक हालचालीची माहिती संकलित करतात. हे तंत्र कुकाबुरा कंपनी आणि स्पोर्टकोर नावाच्या ऑस्ट्रेलियन स्टार्टअपच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित झाले आहे. बॉलच्या आतमध्ये लपवलेले हे सेन्सर बॉलच्या वेगापासून बॉलिंग ॲक्शनपर्यंत अनेक गोष्टी मोजतात. अशा या कुकाबोरा स्मार्ट बॉलमध्ये नेमके काय असते, याचा वेध घेऊ. त्यात सर्वात महत्त्वाचे असते ते मायक्रो सेन्सर युनिट. बॉलच्या कोअरमध्ये बसवलेले हे युनिट बॉलचा वेग, गती, फिरकी, बाऊन्स यांसारख्या क्रियांचा डेटा संकलित करते. त्याखेरीज असते ते ब्लूटूथ टान्समीटर. हा ट्रान्समीटर बॉलमधून संकलित झालेला डेटा जवळील डिव्हाइस (स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक)ला वायरलेस पद्धतीने पाठवतो.
या तांत्रिक सक्षमतेमुळे खेळाच्या अनेक टप्प्यांमध्ये नेमकी खेळी तपासून, उलगडून पाहायला मदत होते. याखेरीज यात एक लहान बॅटरी असते, जी बॉल अनेक तास वापरला, तरी टिकते. ही बॅटरी बदलता येते किंवा रिचार्ज करता येते. गंमत म्हणजे हा बॉल मोबाईल ॲपशी संलग्न असू शकतो. कुकाबुरा स्मार्ट बॉलसाठी खास ॲप उपलब्ध आहे. यामध्ये बॉलिंग आणि गोलंदाजांची पूर्ण माहिती रिअल-टाइममध्ये दिसते. त्याचे काही प्रमुख फायदे लक्षात घ्यायला हवेत. पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे रिअल टाइम डेटा आणि अचूक विश्लेषण उपलब्ध होणे. पारंपरिक बॉलमध्ये फक्त निरीक्षणावर आणि वेगाची मोजणी करू शकणाऱ्या साधनांवर अवलंबून राहावे लागत होते; पण स्मार्ट बॉलमुळे वेगाच्या प्रत्येक टप्प्यावर, फिरकीचे प्रमाण, सीमची स्थिती, बाऊन्स आणि बॉलवरील पॉवर यावर अचूक, डेटा क्षणार्धात मिळतो. प्रशिक्षणात विज्ञानाधारित सुधारणा पाहायला मिळते. प्रशिक्षक आणि खेळाडूंना बॉल रिलिज, सीम, स्पिन, बाऊन्स आदी तांत्रिक बारीकसारीक गोष्टी उलगडून पाहता येतात. त्यामुळे खेळामधील त्रुटी ओळखणे, प्रशिक्षण पद्धती वैयक्तिकृत करणे आणि प्रगतीचा मागोवा ठेवणे सोपे जाते. यामुळे कौशल्य सुधारणा साध्य होते. गोलंदाजाला त्याच्या फिरकीचा वेग, गतीतील अचूक फरक आणि चेंडू सोडतानाचा सीमचा कोन लगेच कळतो. यामुळे आपल्या तंत्रात लगेच सुधारणा करता येते. परिणामी, लाईव्ह ब्रॉडकास्टवेळी प्रेक्षकांना खेळातल्या अचूक विश्लेषणाचा अधिक समृद्ध अनुभव मिळतो.
या तंत्राने सज्ज होणारी खेळी अचूक माहितीसह समोर येते. किंबहुना, फक्त डोळ्याला दिसणारा सामना पाहण्यापलीकडे जाऊन खेळीची वैशिष्ट्ये, गोलंदाजाची नेमकी कामगिरी आणि एखाद्या खेळाडूने दाखवलेले कसब अनुभवायला मिळते. लाईव्ह सामना पाहताना, बॉलवरून मिळणारी प्रत्येक माहिती, जसे की स्पीड, स्पिन, बाऊन्स थेट स्क्रीनवर दिसते. त्यामुळे प्रेक्षकांना सामन्यातील बारकावे आणि खेळाडूचे कौशल्य उत्तम समजते. यामुळे उच्च दर्जाचे अंपायरिंग आणि डीआरएस निर्णय आकाराला येऊ शकतो. इन-बॉल सेन्सर्समुळे माहिती घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक अचूकता येऊन विश्वासार्हता प्राप्त होते. एलबीडब्ल्यू, कॅच किंवा सीमसंबंधित अगदी बारीक विवादांमध्ये बॉलचा ट्रॅक, बाऊन्स वगैरे माहिती अचूक करता येते. हा तपशील विकास आणि तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व समन्वय ठरतो. डेटा स्टोरेज आणि एआय बेस्ड विश्लेषणाने क्रिकेटमधील विविध संशोधन आणि निर्णय प्रक्रियेत मदत होते. खेळाच्या भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यकालीन ट्रेंड एकत्र करता येतात. अनेकदा खेळाडू अन्याय झाला (पंचानी चुकीचा निर्णय दिला) म्हणून हताश होतो. आता असे होणार नाही. दिला गेलेला निर्णय शंभर टक्के बरोबरच असेल. पंचांना याचा मोठा फायदा मिळू शकेल. वेस्ट इंडिज प्रीमियर लीगसारख्या स्पर्धांमध्ये त्याचा यशस्वी वापर झाला आहे आणि लवकरच हे तंत्र आयपीएल आणि इतर मोठ्या लीगमध्ये अधिक नियमितपणे दिसू शकते. कुकाबुरा स्मार्ट बॉलचा उपयोग केल्याने क्रिकेट सामन्याच्या प्रत्येक पातळीवर - प्रशिक्षण, सामना, निवड, ब्रॉडकास्ट आणि निर्णय ढाच्यात एक प्रगत, डेटा आधारित आणि विज्ञानाधारित युगाची सुरुवात होईल.
आज अनेक खेळांच्या लिग सुरू झाल्या आहेत. त्यांचे स्वरूप स्थानिक राहिलेले नाही, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. क्रिकेटसारख्या खेळात तर प्रचंड पैसा गुंतलेला असतो. या खेळांच्या आयोजनात, सादरीकरणामध्ये येत असलेली व्यावसायिकता खास महत्त्वाची आहे. आज सामना पाहायला प्रत्यक्ष येणाऱ्या प्रेक्षकाकडून काही हजार रुपये वसूल केले जातात. ठरावीक सामन्याची उत्सुकता माध्यमांच्या मदतीने प्रचंड प्रमाणात वाढवली जाते. अगदी टीव्हीवर सामना पाहायचा झाला तरी ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून सामन्याचा टर्निंग पॉइंट किंवा विशेष क्षणचित्रे खास पद्धतीने उलगडून दाखवली जातात. यातूनच मग कधी तरी नेटकेपणाने न घेतला गेलेला कॅच, गोलंदाजाने फेकल्यानंतर बॉलने घेतलेला स्विंग किंवा खेळाडूने कॅच घेताना किंवा थ्रो अडवताना सीमारेषेला केलेला - न केलेला स्पर्श याची अचूक माहिती मिळू शकते. या दृष्टीने क्रिकेटमध्ये येत असलेले नवतंत्रज्ञान महत्त्वाचे आणि लक्षवेधी आहे. कुकाबुरा बॉलमधील नवतंत्राने या संदर्भातील नवा अध्याय लिहायला घेतला आहे.