महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी फुलाचा वृक्ष आहे. नारिंगी देठ असलेली पांढरी फुले झाडाला येतात. ही फुले रात्री उगवतात व सूर्योदयापूर्वी झाडावरून खाली पडतात, त्यामुळे सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला आढळतो. असा समज आहे की, या झाडाखाली केलेली प्रार्थना विशेषतः आध्यात्मिक स्वरूपाची पूर्ण होते. या झाडाला शाश्वत प्रेमाचे व सुंदरतेचे प्रतीक मानले गेले आहे.
देव व दानवांच्या युद्धामध्ये देवांना अमर बनविण्यासाठी तसेच त्यांचे ऐश्वर्य परत मिळवण्यासाठी अमृत मिळवणे आवश्यक होते. यासाठी अमृत मंथन करण्यात आले. या महान कार्यासाठी देवांनी दानवांशी मित्रता करून त्यांचेही सहकार्य मिळवले व अखेर समुद्रमंथन झाले. सुरुवातीलाच जहर निघाले ते देवांच्या वाट्याला आले. महादेवाने ते प्राशन केले व कंठातच साठवून ठेवले जे सांडले ते साप विंचू अजगर अशा प्राण्यांनी चाटल्याने ते विषारी बनले. समुद्रमंथनातून पुढे अनमोल वस्तूंसोबत पारिजातक वृक्षही निघाला जो देवांच्या वाट्याला आला, देवांनी तो इंद्राच्या स्वाधीन केला इंद्राने तो आपल्या नंदनवनात लावला.
एकदा देवर्षी नारद स्वर्गातून श्रीकृष्ण भेटीसाठी मथुरेत आले असता येताना त्यांनी पारिजातकाची फुले आणली. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. नारदांनी ती फुले श्रीकृष्णाला अर्पण केली. श्रीकृष्णांनी ती फुले आपली पत्नी रुक्मिणीला दिली. नारदाने ही बाब श्रीकृष्णांच्या अन्य पत्नींपैकी सत्यभामेला जाऊन सांगितली व यावरून श्रीकृष्णाचे रुक्मिणीवर जास्त प्रेम असावे असे बोलून सत्यभामेतील इर्षेला जागृत केले.
सत्यभामेने कृष्णाजवळ पारिजातकाचा वृक्ष हवा म्हणून हट्ट धरला. कृष्णाने इंद्र देवाकडे या वृक्षाची मागणी केली. मात्र इंद्राने नकार दिला. हा वृक्ष देवतांसाठी असून मनुष्यांसाठी नाही. वृक्ष पृथ्वीवर नेल्यास देवता नाराज होतील, कारण स्वर्ग व पृथ्वी यामध्ये अंतर राहणार नाही. या कारणास्तव इंद्राने कृष्णाला पारिजातकचा वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा कृष्णाने सात्यकी, दारूक, प्रद्युम्न वगैरेंसह गरुडावर स्वार होऊन स्वर्गावर स्वारी केली. कृष्णाने प्रथम नंदनवनात जाऊन माळ्यांला वृक्षाची मागणी केली. मात्र हा वृक्ष इंद्रपत्नी शशी हिने फार प्रेमाने जोपासला असून तो तिचा आवडता वृक्ष आहे. त्यामुळे हा आपणास देता येणार नाही. यासाठी इंद्रदेवही नाराज होतील व प्रसंगी युद्धासही तयार होतील असे सांगितले.
हे ऐकून कृष्णाने वृक्ष उपटून गरुडावर ठेवला. सत्यभामेने माळ्यांना सांगितले शशीला सांगा आम्ही वृक्ष घेऊन जात आहोत अडवून पाहा. माळ्यांनी तो निरोप इंद्राला दिला. निरोप मिळताच इंद्र सैन्यांसह आला. इंद्र व श्रीकृष्णमध्ये घनघोर युद्ध झाले. अखेर ब्रह्मदेव व अदिती यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबविले. इद्राने कृष्णाची क्षमा मागून आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. आपण हा वृक्ष द्वारकेला नेऊ शकता. माझे अपराध पोटात घालावे. अशी विनंती केली. कृष्णाने वृक्ष आणून सत्यभामा व रुक्मिणीच्या निवासाच्या सीमारेषेवर मध्यभागी लावला त्यामुळे वृक्ष जरी सत्यभामेच्या आवारात असला तरी फुले मात्र रुक्मिणीच्या परिसरात पडत होती. अशा प्रकारे सत्यभामेचा वृक्षासाठी केलेला हट्ट श्रीकृष्णाने पूर्ण केला. वृक्ष स्वर्गलोकांतून पृथ्वीवर आणत असताना या झाडाची काही बीज सातपुडा च्या जंगलात पडली त्यामुळे सातपुड्यातही याची काही झाडे आढळतात असा अनेकांचा समज आहे. तसेच उत्तर प्रदेशात किंतूर येथील पारिजातक वृक्ष महाभारत कालीन असल्याचे सांगितले जाते, तर उत्तर प्रदेशातील वृंदावन या शहरात पारिजातकांची अनेक वृक्ष पाहावयास मिळतात. पारिजातक हा वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. हा वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून मनुष्यांच्या जीवनाला आवश्यक असणारा ऑक्सिजन सोडणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. पर्यायाने मानवी जीवनासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्याच्या पानांचा रस औषधी गुणांनी युक्त आहे. ताप त्वचारोग यावर पारिजातकांच्या पानांच्या रसाचा उपचार प्रभावी ठरतो.






