मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
जीवन हे भोगाची जननी नसून कर्तव्याचे माप आहे. कर्तृत्व निष्ठा, जीवन कर्तृत्वाची भूमी आहे. ती हौसे मौजेची वस्तू नाहीच. आपला जन्म होतो. तेव्हा पहिला श्वासापासून झुंज सुरू होते ती आयुष्यभरासाठी. जातानाही आणि येतानाही माणूस हा रिता असतो. पण आहे तोवर सतत मोहमाया शडरिपू यातून धडपड करणे. हा त्याचा स्थायीभाव कधी कधी ही माणसं स्वतःसाठी जगतात, तर कधी इतरांसाठी. म्हणजेच जगण्याच्या कालावधीत आपण आपलं जीवन सजवतो. बारशाला १२व्या दिवशी आपलं नामकरण होतं.
आपल्याला नाव मिळते. मग त्या नावानेच आपल्याला ओळखले, पुकारले जाते. त्याची नोंद राहते. त्या नावाभोवती व्यक्तिमत्त्व इमेज भविष्य घडू लागतं. या प्रयत्नामध्ये आपण सतत काही ना काही धडपड करत असतो. आपापल्या विचार कृती महत्त्वाकांक्षा तसेच अाशा-आकांक्षा व स्वप्ने पूर्णत्वास नेण्याकडे आपला कल असतो. या दरम्यान आपल्या हातून अनेक विविध कार्य घडतात आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या निभावण्यामध्येच आपले आयुष्य पुढे पुढे सरकत असते. ही कर्तव्यनिष्ठा, कामाप्रती आदर यातून बऱ्याच गोष्टी शिकत जातो. खरं तर हेच कार्य म्हणजे जीवन. जीवन ही कर्तव्याची भूमी आहे. व्यक्ती परतवती भिन्नच आहे. प्रत्येकाची उदाहरण वेगळी, गाथा वेगळी, कथा वेगळी, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये सर्व मूल्यतत्त्वांवर आपल्याला आपले कार्य करत राहावे लागते. परोपकारासारखे पुण्य नाही आणि परपिडासारखे पाप नाही म्हणून पुण्य सत्कार्याकडे आपला कल जास्त राहतो. कर्तत्वाच्या थेंबा थेंबान् विशाल अशा महासागराची निर्मिती घडविणारा माणूस! माणुसकी,मानवता, भूतदया इ. संवेदनशील मूल्य तो जपत असतो. आपल्या जीवनाचे सार्थक करतो. जीवनाला कोंदण देतो उदा. ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून महत्कार्य केले.
संत गाडगेबाबा, संत नामदेव, संत एकनाथ, संत बहिणाबाई, समर्थ रामदास यांनी त्यांच्या कर्तव्याची फुलबाग सजवली. फुलवली. त्याचा अजतागायत कर्तव्यरुपी सुगंध दरवळतच आहे. त्यांच्या कार्यरूपाने ते अजरामर झाले. त्यांची सत्कर्म ग्रंथसंपदा आणि मूल्य आपण जोपासतो हेच ऐश्वर्य आपण पुढे नेतो. संस्कृती टिकवतो. संत तुकोबारायांची गाथा, एकनाथांचे भागवत, समर्थांचे श्लोक, आचार्यांचे गीताई, कबिराचे दोहे, बहीणाईची गाणी अशा अनेक प्रतिभावंतांचे शब्दरूपी ऐश्वर्य संपन्नता आपले जीवन उजळून टाकते. अासमंत उजळून टाकते. क्षितिजापार झेंडे फडकवले जातात. अटकेपार पताका लावल्या जातात. या अशा अविरत इतिहासाचे पान अजरामर होते. सोनेरी अक्षराने लिहिले जातात. हीच कर्तव्याची भूमी आहे. हिमालयाची उत्तुंगता, महासागराची उदात्तता, तर यात आहेच. उंच भरारी घेऊन उंच झेपावण्याची क्षमता देखील आहे. प्रज्ञा, प्रतिभेचा सुंदर असा संगम यामध्ये आहे. कधी सहज, कधी मृदू, क्षमाशील शांतीतून क्रांती घडविणारे! कर्तव्याची प्रचिती देणारे, ऐक्याचं बळ, विवेकाचं फळ तर कधी संघर्ष यात्रा! अशा अद्वितीय प्रवासालाच जीवन संघर्ष म्हटले आहे. आपण आपलेही जीवन जगत असताना इतरांप्रती किती कामास येतो? किती परोपकार करतो? अडल्या नडल्याला किंवा रंजल्या गांजल्यांना आपण किती कामास येतो? हे आजपासून तपासून पाहूया. भिन्न, काळाकुट्ट काळोखातही उज्ज्वल पहाटेचे स्वप्न पाहूया. प्रयत्न, जिद्द, चिकाटी हीच तर कर्तव्याची फलश्रुती. कर्तव्याची गाथा. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण आपल्या हातांनी निर्माण केलेली ही फुलबाग अशीच फुलू द्यावी. नि:स्वार्थपणे निस्पृह आणि निरपेक्षपणे. कारण बरोबर जाताना आपण काहीच घेऊन जात नाही. येताना काही आणत नाही. पण मधला जो काळ आहे, जीवन जगण्याचा आपला भरभरून इतरांना दोन्ही हातांनी ओंजळ भरून देता येईल तितकं द्यावं. हाच जीवनाचा गाभा प्रवासाचा खरा मंत्र. परोपकार, सेवेचा खरा मंत्र.
कितीही वादळे आली तरी अविरत सेवा, अथक मेहनत, जिद्दीने वाटचाल आणि ध्येयाप्रत पोहोचण्याचे धाडस असले पाहिजे. साहस केले पाहिजे, तर आणि तरच आपण जीवनामध्ये दीप उजळू शकतो. यशोशिखरावर जाऊ शकतो हा मनात अट्टहास असू द्या. जीवनसंग्रामात कधी हरू नका. जीवन संग्राम आहेच. यात्रा आहे. संघर्ष आहे. रणांगण आहे. पण खऱ्या अर्थाने मानव जन्म सार्थक करण्यासाठी आपल्याला जगायला मिळालेली एक संधी आहे. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. थकल्या भागल्या मनाला विचारा. पुढच्या दिशेला लागा. हीच आहे जीवन जगण्याची कला. आनंददायी, उत्साही, सकारात्मक. निश्चित यश ही आपलीच वाट पाहत उभे असेल. कर्तव्याचे माप भरावे कीर्तीरूपी उरावे असेही जीवन. समर्पण त्याग सेवेचे उत्तम उदाहरण.