फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या दहशतवादी उमरने हरियाणातील फरिदाबादमध्ये अल फलाह विद्यापीठाजवळ घर भाड्याने घेतले होते. उमरच्या घरातच बॉम्ब निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र होते. इथे घेतलेल्या प्रशिक्षणाचा वापर करुन दहशतवादी उमरने आयईडी बसवला होता.
भारतीय तपास यंत्रणांना संशय आला असून धरपकड सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे गडबडलेल्या दहशतवादी उमरने घाईघाईने आयईडी कारमध्ये बसवला होता. हे काम व्यवस्थित झाले नव्हते. यामुळेच गर्दीच्या परिसरात स्फोट झाला पण दहशतवाद्यांना अपेक्षित असलेले मोठे नुकसान झाले नाही. लाल किल्ल्याजवळ कारमध्ये ठेवलेला आयईडी फुटला. या स्फोटात दहशतवादी उमर ठार झाला. मृतांच्या डीएनए चाचण्या केल्या त्यावेळी ही बाब उघड झाली. यानंतर तपास यंत्रणांनी हाती आलेल्या माहितीवरुन माग काढत उमरचे घर शोधले. उमरच्या फरिदाबादच्या घरावर तपास यंत्रणांनी धाड टाकली. धाड टाकल्यावर दहशतवादी उमरचे फरिदाबादचे घर म्हणजे बॉम्ब निर्मितीचा कारखाना असल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात आले.
दहशतवादी उमर बॉम्ब तयार करण्याच्या कामात तज्ज्ञ होता. तो सहकाऱ्यांनाही प्रशिक्षित करत होता. उमरच्या घरात स्फोटकांपासून बॉम्ब तयार करणे, बॉम्ब तयार करण्यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षित करणे ही सर्व कामं सुरू होती. या कामांकरिता आवश्यक असलेली एक प्रयोगशाळा उमरच्याच घरात उभारली होती. पाकिस्तानमधून व्हिडीओद्वारे उमर आणि त्याच्या सहकाऱ्यांना बॉम्ब निर्मितीसाठी मार्गदर्शन करायला सुरुवात झाली होती. फरिदाबादमधील दोन ठिकाणांहून ३५८ किलो आणि २५६३ किलो स्फोटके जप्त करण्यात आली. ही स्फोटके बॉम्ब निर्मितीसाठी वापरली जाणार होती. पण स्फोटकांचा वापर होण्याआधीच तपास यंत्रणा पोहोचल्या आणि स्फोटके जप्त करण्यात आली. यामुळे संभाव्य संकट टळले.
स्फोटके सुटकेस आणि बॅगमध्ये भरलेली होती. त्यात धातूचे तुकडे नव्हते. दहशतवादी सामान्यतः बॉम्बमध्ये लोखंडी गोळ्या वापरतात, ज्यामुळे मृतांची संख्या वाढते. शनिवारी नौगाम पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटाचा संबंध फरिदाबाद मॉड्यूलशी असल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे. फरिदाबादमध्ये जप्त केलेली स्फोटके चाचणीसाठी नौगाम पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती. डीजीपींनी सांगितले की, नमुन्याच्या तपासणीदरम्यान स्फोट झाला.






