लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
व्यवस्थितपणा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त, नियोजन आणि स्वच्छता ठेवणे. जो व्यक्ती आपले काम वेळेवर आणि नीटनेटकेपणे करतो, तोच खरा व्यवस्थित माणूस म्हणवतो. व्यवस्थितपणा ही फक्त एक सवय नसून, ती यशाचे मूळ आहे.
व्यवस्थितपणा आपल्या आयुष्याला दिशा देतो. जर आपण आपला वेळ, वस्तू आणि कामे यांचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केले, तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करणे सोपे होते.
उदाहरणार्थ, जो विद्यार्थी रोज आपले पुस्तक, वही, शाळेची बॅग आणि वेळापत्रक नीट ठेवतो, त्याचा अभ्यास करताना गोंधळ होत नाही.
घरातही जर प्रत्येक वस्तू ठरलेल्या ठिकाणी ठेवली, तर शोधाशोधीचा त्रास होत नाही. शाळेत, कार्यालयात किंवा समाजात - प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित माणसाची वेगळी ओळख निर्माण होते.
व्यवस्थितपणा म्हणजे केवळ वस्तू नीट ठेवणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि वर्तन यातही सुसंगती ठेवणे आवश्यक असते.
शाळेतील विद्यार्थी : रोज वेळेवर उठणे, गणवेश नीट ठेवणे, अभ्यासाचे नियोजन करणे - हा त्याचा व्यवस्थितपणा.
खेळाडू : रोज ठरलेल्या वेळेला सराव करणे, आहार आणि व्यायामात शिस्त ठेवणे - त्यामुळेच तो यशस्वी होतो.
गृहिणी : घरातील प्रत्येक काम ठरलेल्या क्रमाने केल्याने घरात शांतता आणि सौंदर्य टिकते.
व्यवस्थितपणा हे जीवनातील सौंदर्य आहे. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात शिस्त आणि नियोजन ठेवते, ती कधीच गोंधळलेली राहत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रतिभा जितकी आवश्यक आहे, तितकाच व्यवस्थितपणा देखील आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले काम व्यवस्थित केले पाहिजे. “व्यवस्थित जीवन म्हणजे यशस्वी जीवन” स्वच्छतेची पुढची पायरी म्हणजे टापटीप, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा. व्यवस्थितपणा हा एक चांगला संस्कार आहे. वस्तू इतस्तत: ठेवणं, पसारा करणं, कोंबाकोंबी करणं म्हणजे गबाळग्रंथी कारभार. बऱ्याच जणांना सवय असते की, दिसेल ते कपाटात, ड्रॉवरमध्ये कोम्बवून ठेवायची. मग ऐनवेळी होते काय फजिती – कपाट उघडलं की वस्तू सैरावैरा पसरतात, दुडुदुडू खाली येतात.
मग घाईगर्दीच्या वेळी वेळ जातो, बावळटपणा, वेंधळेपणा पदरी येतो, बावरल्यागत व्हायला लागते. गोंधळ वाढायला लागतो. पेन आहे तर शाई नाही, पेन्सिल आहे तर टोक नाही. पुस्तकं खरेदी केली, त्यांना छान कव्हरही घातलं, पण ती व्यवस्थित न वापरता ठेवली, भिरकावली तर पानं सुट्टी होतात, महत्त्वाचे धडे-कविता यांची पानं फाटल्याने किंवा गहाळ झाल्याने ऐन परीक्षेच्या वेळी नुकसान होते. चार-सहा दिवसांसाठी नव्या पुस्तकाचा खर्च पालकांच्या माथी बसतो.
तुम्ही मुलं वह्यांची पानं फाडता, पेन चालवून बघण्यासाठी रेघोट्या मारतात. तुमची पुस्तकं दुमडून ठेवता, त्यांची पानं निसटलेली किंवा फाटलेली असतात. दप्तरात सारं काही कोंबलेलं असतं. कपडे नीट धुतलेले, इस्त्री केलेले नाहीत, केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला नाही, चप्पल तुटलेली किंवा बूट पॉलिश नसलेले, दप्तराचा एखादा बेल्ट तुटलेला अशी अव्यवस्थित मुलं शाळेत येतात. अव्यवस्थित, गबाळी, वेंधळी मुलं रोज काही ना काही वस्तू शाळेत विसरतात.
व्यवस्थितपणाचे फायदे या मुलांनी लक्षात घेतले आणि व्यवस्थितपणा अंगी यावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर वेळ, पैसा, श्रम यांची बचत तर होईलच, शिवाय आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक, प्रभावी होण्यासही मदत होईल. सर्व मुलांचे लाडके नेहरूचाचा यांचं रुबाबदार, आदर्श व्यक्तिमत्त्वाचं रहस्य म्हणजे नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा.
पुस्तकं व्यवस्थित, काळजीपूर्वक वापरली नाहीत, तर त्यांना राग यायचा. पुस्तकांचा अपमान म्हणजे आपल्या संस्कारांचा अपमान असं ते मानायचे. व्यवस्थितपणा म्हणजे वेळेचं योग्य नियोजन करणं, प्रत्येक काम योग्य रीतीने करणं, फाईल तयार करणं, योजना नीट आखून काटेकोर अंमलबजावणी करणं. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आणि यशस्वी जीवनासाठी व्यवस्थितपणा अंगी बाणवायलाच हवा.