Sunday, November 16, 2025

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अजून पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही स्वतःचे फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करून आपली ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसत आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांना दररोजचा खर्चाचा तपशील निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यास मनाई असल्याने आचारसंहितेपूर्वी सोशल मीडिया, न्यूज चॅनल, वेब पोर्टल, बॅनर्स, होर्डिंग्ज यांसारख्या माध्यमांतून “फुकट प्रचार” करण्याकडे इच्छुक उमेदवारांचा कल वाढला आहे. काही जणांनी तर पक्षाने हिरवा कंदील दिल्याचे गृहीत धरून आधीच पोस्टर्स आणि होर्डिंग्ज बसवायला सुरुवात केली आहे.

ज्यांच्या जागा आरक्षण बदलामुळे गेल्या, त्या माजी नगरसेवकांनी आता महिला आरक्षणामुळे आपल्या पत्नींचे फोटो सोशल मीडियावर झळकवायला सुरुवात केली आहे. काहींनी तर वाढदिवस किंवा स्थानिक कार्यक्रमांचा बहाणा करूनच मतदारांना आपली तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न वेगात सुरू केला आहे.

काही भागांत तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरक्षणात आपला “हक्काचा” नगरसेवक बचावला, तोच पुन्हा निवडणूक लढवणार या खात्रीने फटाके फोडून साजरे करत, भेटीगाठी घेऊन निवडणूक उत्सवाची सुरुवात करून टाकली आहे.

Comments
Add Comment