Sunday, November 16, 2025

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ ह्युंडाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरू असलेल्या चौकशीत मुख्य संशयित डॉ. मोहम्मद उमर उन-नबीबाबत नवे तपशील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तो हरियाणातील नुह येथील एका भाड्याच्या खोलीत लपून राहिला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे, तो या काळात अनेक मोबाईल फोनचा वापर करत होता आणि सतत ठिकाण बदलण्याचा देखील प्रयत्न करत होता.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डॉ. उमर उन-नबी हा ‘व्हाईट कॉलर टेरर सेल’शी जोडला असल्याचा संशय आहे. त्याचा सहकारी डॉ. मुझम्मिल शकील गनीला अटक केल्यानंतर तो फरिदाबादमधील अल-फलाह मेडिकल कॉलेज सोडून ३० ऑक्टोबरला नुहमध्ये दाखल झाला.

अल-फलाह विद्यापीठातील नर्सिंग स्टाफ सदस्य शोभा खानने त्याला आपल्या मेहुणी अफसानाच्या घरी राहण्याची सोय करून दिली होती. येथे त्याने एक खोली भाड्याने घेतली. घरातील कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमर दिवसा एकदाही बाहेर पडत नसे. त्याच्याकडे दोन स्मार्टफोन होते आणि तो केवळ रात्री अंधार झाल्यानंतरच जेवणासाठी बाहेर पडायचा. सलग ११ दिवस तो एकाच कपड्यांमध्ये होता असेही स्थानिकांनी सांगितले.

तो ९ नोव्हेंबरच्या रात्री अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर खोलीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घरच्यांना शंका आली. याच दरम्यान टीव्हीवर लाल किल्ला स्फोटाची बातमी समोर आली आणि पोलीस घरात चौकशीसाठी पोहोचले.

तपासात मिळवलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्फोटाच्या काही दिवस आधी उमर फरिदाबादमधील एका मोबाईल दुकानात दोन फोन घेऊन जाताना दिसला. मात्र, स्फोट झालेल्या i20 कारच्या फॉरेन्सिक तपासणीत कोणताही फोन सापडला नाही. त्यामुळे त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी फोन फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक २ आणि ३ डीएमआरसीने पुन्हा प्रवाशांसाठी खुले केले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलिस ठाण्यात तपासासाठी आणलेल्या स्फोटकांची पाहणी करताना झालेल्या अपघाती स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. ही स्फोटके हरियाणातील फरिदाबाद येथून जप्त केलेल्या सामग्रीचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सामग्री अटक केलेल्या डॉ. मुझम्मिल गनीच्या भाड्याच्या खोलीतून मिळालेल्या ३६० किलोग्रॅम स्फोटकांपैकीच होती.

Comments
Add Comment