बीजिंग : चीनमधील एका आईने आपल्या कोमात असलेल्या मुलीला १० वर्षे रोज नृत्य करवून चमत्कारिकरीत्या बरे केले आहे. हुनान प्रांतात राहणाऱ्या ५९ वर्षीय शियाओ शुएफेई यांचे आयुष्य त्या क्षणी बदलले, जेव्हा त्यांची मुलगी यांग फांग ही ग्वांगझूमध्ये काम करत असताना गंभीरपणे आजारी पडली आणि कोमात गेली. डॉक्टरांनी यांगला शुद्धीवर येण्याची शक्यता खूप कमी असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यांनी उपचारांवर खर्च करणे बंद करण्याचा सल्लाही दिला; पण शियाओ यांनी हार मानली नाही.
शियाओ यांनी आपल्या मुलीला सामान्य वॉर्डमध्ये हलवले आणि स्वतः तिची काळजी घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी सांगितले की, संगीत आणि हालचालींमुळे मेंदूच्या नसा सक्रिय होतात. यावर शियाओ रोज सकाळी आपल्या मुलीला पार्कमध्ये घेऊन जात आणि तिचे हात धरून ‘स्क्वेअर डान्स’ च्या तालावर नृत्य करत असत. हळूहळू पार्कमधील इतर महिलाही त्यांच्यासोबत सामील झाल्या आणि सर्वांनी मिळून यांगला हलक्या हालचाली शिकवायला सुरुवात केली. सतत दोन वर्षे मेहनत केल्यानंतर, एक दिवस यांगने पहिल्यांदा बोलून सांगितले, ‘आई, तू खूप चांगली आहेस.’ हे ऐकून शियाओ ओक्साबोक्सी रडू लागल्या. जेव्हा मुलीला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिच्या मेंदूच्या हालचालीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी याला ‘मिरॅकल’ म्हटले. शियाओ यांनी सलग १० वर्षे दररोज डान्स थेरपी सुरू ठेवली. आता यांग स्वतः चालू शकते, बोलू शकते. स्वतःची काळजी देखील घेते.






