कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे.
एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा , पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.
ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बाहल केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
भाऊंचे वडील आत्मारामपंत हे मूळचे सावंतवाडीचे. मात्र कौटुंबिक कलहामुळे ते भरल्या पानावरून उठले. ते, पुन्हा त्या घराचं तोंड पाहायचं नाही, या निर्धारानं. अत्यंत रागीट स्वभावाच्या या माणसांची भाऊंना कधी भीती वाटली नाही. त्यांच्या मायेचा गारवा भाऊ अखेपर्यंत विसरले नाहीत. भाऊंचा जन्म सांगलीला झाला असला तरी ‘आमचे घर’ असा उल्लेख ते आपल्या सावंतवाडीतील घराचाच करतात. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊंच्या संमतीविना किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता भाऊंना दत्तक देण्याचा घाट आप्तांनी घातला. निसर्गाचं संजीवक सामर्थ्य सांगलीत किंवा पुण्यात अनुभवता आलं नव्हतं. पण दत्तक होण्यासाठी येताना आंबोलीच्या सृष्टीसौंदर्याने कोकणभूमीच्या केवळ दर्शनानं भाऊंना आपलंसं करून टाकलं. सावंतवाडी येथील हे भटवाडीतील घर आणि सावंतवाडीहून सात-आठ मैलांवर असलेल्या नानेली गावातला जमीन जुमला लहानपणी मातृपितृहीन झालेल्या आणि विष्णुशास्त्रींच्या सावलीत वाढलेल्या सखारामबापूंना मिळाली होती. दत्तक झाल्यानंतर काही दिवस ते सावंतवाडी-भटवाडीत राहिले. पुढे नानेलीस गेले. दत्तक आईकडून आणि बहिणीकडून अपार माया मिळाली. विष्णू सखाराम खांडेकर हे नाव नानेली गावाशी जोडलं गेलं. त्या गावचा एक घटक म्हणून.
पाच-सातशे वस्ती असलेले नानेली लहानसे खेडे. आकेरीच्या बाजारातून माणगाव-नानेलीची वाट फुटते. वेड्यावाकड्या दगडांच्या भल्यामोठ्या गडग्याच्या विस्तीर्ण पडद्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या वास्तूंपैकी पश्चिमेकडील वास्तू म्हणजे भाऊंचं जुनं घर आणि पूर्वेकडचं घर (मांगर) येथे सखाराम बापूंचं बिऱ्हाड ते परकं घर भाऊंना आपलं वाटावं यासाठी दत्तक आई व बहीण जीवाचा आटापिटा करीत. नानेलीत भाऊंच्या ओळखीचं कुणीच नव्हतं. मन गुदमरून टाकणाऱ्या नानेलीतल्या पहिल्या निवासात खरा धीर मिळाला तो या निसर्गाच्या सहवासानं. नानेलीतल्या भटकंतीत कष्टकरी लोकांच्या अंतरंगाचे दर्शन होई आणि तेथील माणसांच्या दारिद्र्याचं मुद्रेवर उमटलेलं प्रतिबिंबही वाचता येई. वैयक्तिक दु:खाच्या जोडीला सामाजिक दु:खही भाऊंनी पदरी बांधून घेतलं. स्वत:चं जीवन थोडं नीटनेटकं होईल. आपल्या जगण्यातलेच सारे संदर्भ घेऊन भाऊंनी अमाप लेखन केलं. मनातील खळबळ शब्दांतून व्यक्त करणे हीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा. भाऊंना शहर नकोच होतं. त्यांना खेड्यात जायचं होते.
१३ एप्रिल १९२० रोजी भाऊ शिरोड्याला ‘टय़ुटोरिअल इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. ‘आता मी या शाळेतच राहणार. दुसरीकडे कुठं जाणार नाही, असा निश्चय केला. सोबत होती अक्काची. इथे जोमाने लेखनाला सुरुवात झाली. शाळेसाठीही कितीही कष्ट सोसण्याची भाऊंची तयारी होती. खेडेगावात कुठल्याही गोष्टीला राजकारणाचं स्वरूप फार लवकर येतं. याचे अनुभव भाऊंना वारंवार आले. तरीही लेखनकाम चालू ठेवत ते मनाला बजावत राहिले. ‘तुझं काम इथंच आहे. या अंधारात, अधून मधून का होईना, मुला चमकत राहिलं पाहिजे, वाट चुकलेले कुणीतरी प्रवासी त्या क्षणिक प्रकाशात सावध होतील. आपल्या योग्य वाटेला लागतील.’ ही जाणीव जागी ठेवली ती भाऊंच्या विद्यार्थ्यांनी. १९२० ते १९२५ या काळात भाऊ अगदी अंतर्बाह्य एक खेडवळ शिक्षक बनले. १९२४ ते १९३२ या काळात भाऊंनी ‘वैनतेय’मध्ये सातत्याने लेखन केले. हे साप्ताहिकाचे नावही भाऊंनी सुचवलेले. याचं मुख्य क्षेत्र सावंतवाडी संस्थान असल्याने ग्राहक वर्ग मर्यादित. मात्र, महाराष्ट्रातील नव्या-जुन्या साहित्यिकांनी वैनतेयास लेखनसहाय्य केलं इथेच भाऊंना प्रकट व्हायला मोठा अवसर मिळाला.
मात्र, सतत दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या भाऊंना आपल्या शाळेचा विसर कधीच पडला नाही. १९३८ मध्ये चित्रपट लेखनाच्या निमित्ताने भाऊ कोल्हापुरास आले आणि अखेपर्यंत कोल्हापुरात राहिले. असं असलं तरी भाऊंचे मन मात्र शिरोड्याच्या शाळेत गुंतले होते. कारण कोकणातून कुणीही भाऊंना भेटायला गेलं की त्यांचा पहिला प्रश्न ‘शाळा व्यवस्थित आहे ना? काही अडचण नाही ना?’अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानपीठ मिळाल्यानंतरही त्यांचे पाय इथल्या कोकणच्या लाल मातीकडेच ओढ घेत होते. अगदी २ सप्टेंबर १९७६ च्या सकाळपर्यंत इहलोकींची भाऊंची यात्रा संपेपर्यंत!






