Saturday, November 15, 2025

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत येथील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. काल या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष ‘जनजातीय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. राज्य शासनानेही राज्यातील आदिवासी नायकांचा गौरवशाली इतिहास पुस्तकरूपाने जनतेसमोर आणला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारला आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्वयम् योजना’ राबविण्यात येत आहे. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेद्वारे दीड लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत मदत करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात आदिवासी समाजाच्या विकासासाठी ‘धरती आबा कार्यक्रम’ देशभर राबविण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळांचे डिजिटायजेशन झाले आहे. ३७ एकलव्य शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण

  1. सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण, शासकीय आश्रमशाळा पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
  2. आदिवासी विभागाच्यावतीने आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रमय पुस्तका’चे आणि ‘आदिवासी परंपरा व सर्जनशिलता’ यावर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, डॉ. आशिष देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.

आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  1. देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासाठी संकल्प करण्याचे आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
  2. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, एप्रिल महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्यावतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे ४० हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जनजातीय गौरव वर्षांतर्गत करण्यात आलेल्या विविध आयोजनांची त्यांना माहिती दिली. राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा