Sunday, November 16, 2025

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या तीन दिवसांत लागण्याची शक्यता वाढली आहे.

सामना शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झाला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. निर्णायक डावासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला लवकर दोन धक्के बसले. फक्त एक धाव झाली असताना यशस्वी जयस्वाल आणि दुसरी धाव झाल्यानंतर केएल राहुल बाद झाला. आता नाईटवॉचमन वॉशिंग्टन सुंदर आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल खेळत आहेत. भारताने दोन बाद २१ धावा केल्या आहेत. कोलकाता कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी १०३ धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता कसोटीत आतापर्यंत ३१ फलंदाज बाद झाले आहे. एवढ्या कमी वेळात ३० पेक्षा जास्त फलंदाज बाद झाल्यामुळे सामना लवकर संपण्याची शक्यता वाढली आहे.

याआधी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सात बाद ९३ वरुन या धावसंख्येवरुन पुढे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. बुमराहने काँर्बिनला क्‍लीन बोल्‍ड केले. त्‍याने ३७ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकार फटकावत २५ धावा केल्‍या. काँर्बिनला क्‍लीन बोल्‍ड झाल्यानंतर थोड्याच वेळात टेम्बा बावुमाने चौकार मारत अर्धशतक केले. दक्षिण आफ्रिकेने १५० धावांचा टप्पा ओलांडला. यानंतर मोहम्मद सिराजने सात धावा करणाऱ्या हार्मरला क्‍लीन बोल्‍ड केले. नंतर सिराजने केशव महाराजला पायचीत केले. कर्णधार टेम्बा बावुमा नाबाद राहिला. त्याने १३६ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. भारताला विजयासाठी शेवटच्या डावात १२४ धावा करण्याचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने दिले.

भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्को जॅन्सनने सलामीवीर यशस्वी जयस्वालला बाद केले. यशस्वी आपले खाते उघडू शकला नाही. जयस्वाल पाठोपाठ केएल राहुल यालाही मार्को जॅन्सनने बाद केले. भारताचे दोन्‍ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. आता मैदानात असलेल्या सुंदर - जुरेल जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

Comments
Add Comment