Saturday, November 15, 2025

ए मेरे दिल कहीं और चल...

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी वाटलेले असते ‘आता इथे थांबूच नये.’ ‘इथे’ म्हणजे फक्त ज्या घरात आपण राहत आहोत ते घर, ते गाव, तो देश, ते ऑफिस किंवा ती संघटना नव्हे बरं का, तर अगदी या जगातच राहू नये असेही कधीतरी वाटून गेलेले असते! कधीकधी ‘जगण्यात काही अर्थ नाही’ असे वाटण्याइतपत निराशा मनाला घेरून टाकते आणि आठवतात तलत मेहमुदच्या रेशमी आवाजातील कविवर्य शैलेन्द्र यांच्या ओळी- ‘ऐ मेरे दिल कहीं और चल ग़मकी दुनियासे दिल भर गया. ढूंढ ले अब कोई घर नया, ऐ मेरे दिल कहीं और चल...’

चित्रपट होता १९५२ सालचा अमिय चक्रवर्ती यांचा ‘दाग’. दिलीपकुमार, उषा किरण, ललिता पवार, लीला मिश्रा, सी. एस. दुबे अशा दिगज्जाबरोबर होती निम्मी, कन्हैयालाल, कृष्णकांत, लक्ष्मण राव आणि जवाहर कौल. अक्षरश: प्रत्येकाचा अभिनय ५२ कशी सोने होते.

तसे ‘दाग’ नावाचे ५ सिनेमा येऊन गेले. पहिला हाच १९५२ सालचा दिलीपकुमार नायक असलेला, दुसरा राजेश खन्ना शर्मिला टागोर आणि राखीचा १९७३ सालचा रोमँटिक ‘दाग’, तिसरा महिमा चौधरी आणि संजय दत्तचा १९९९चा दाग, चौथा उमटला २००१ साली आसामी भाषेत मुनीन बारुवा यांच्या चित्रपटात आणि पाचवा होता अगदी परवाचा-म्हणजे २०२२ साली शेजारच्या बांगला देशात निर्माण झालेला वेब-चित्रपट ज्यात त्यांचा मुशर्रफ करीम प्रमुख भूमिकेत होता.

शंकर (दिलीपकुमार) एक मूर्ती बनवणारा गरीब कलाकार त्याच्या आईबरोबर (ललिता पवार) राहत असतो. शेजारच्या पार्वतीवर (निम्मी) त्याचे प्रेम असते. तसेच तिचेही त्याच्यावर जीवापाड प्रेम असते. गरिबीमुळे शंकरवरचे कर्ज वाढत जाऊन तो निराशेमुळे दारूच्या आहारी जातो. एका दिवशी त्या व्यसनाचा अंमल असताना त्याच्या हातून प्रेमिका आणि आईशी वागताना अक्षम्य चुका घडतात. त्यांचे गांभीर्य लक्षात आल्यावर शंकर घर सोडून शहरात जातो. योगायोगाने तिथे चांगली कमाई करून काही काळाने तो घरी परत येतो आणि सर्व कर्ज फेडून टाकतो.

नव्या आत्मविश्वासाने तो जगतनारायण या पार्वतीच्या सावत्र भावाकडे (कन्हैयालाल) तिला मागणी घालतो, पण त्याला कळते की तिचे लग्न दुसरीकडे ठरवले गेले आहे. पुन्हा टोकाच्या निराशेमुळे तो व्यसनाधीन होतो. शेवटी अनेक नाट्यमय घटना घडून ते लग्न मोडते आणि ‘शंकर-पार्वती विवाह’ पार पडतो अशी ही सुखांतिका!

जेव्हा शंकर अतिशय निराश मन:स्थितीत असतो तेव्हा तलत मेहमूदच्या आवाजातले एक गाणे चित्रपटात अनेकदा वाजते. शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेले ते तलतच्या आवाजातले गाणे एकेकाळी अतिशय लोकप्रिय होते.

जेव्हा माणसाची शेवटची आशा संपते, आता पुढे काहीही चांगले घडणार नाही असे विचार मनाला घेरतात तेव्हा त्याला कितीही आशावादी विचार सांगितले तरी ते पटत नाहीत. तो म्हणतो, ‘आता मला हा आशा-निराशेचा खेळच नको. जर माझ्या मनातले स्वप्न कायमचे भंगले असेल, जीवनातील वसंत कोमेजला असेल तर काय उपयोग? नका मला सांगू पुन्हा आशावादाच्या गोष्टी! माझ्या हृदयातली जी जखम भरून आली असे मला वाटत होते ती तर पुन्हा भळाभळा वाहू लागली आहे - ‘चल जहाँ गमके मारे न हों, झूठी आशाके तारे न हों. इन बहारोंसे क्या फ़ायदा, जिसमें दिलकी कली जल गई. ज़ख़्म फिरसे हरा हो गया, ऐ मेरे दिल कहीं...’

अशा वेळी कुणी कितीही सांत्वन केले तरी मनाला पटत नाही. सगळेच खोटे वाटू लागते. शेवटी जवळचे मित्र, नातेवाईक एका मर्यादेपर्यंतच मदत करू शकतात. नंतर प्रत्येकालाच त्याचे व्यक्तिगत आयुष्य असते, समस्या असतात. मात्र ही गोष्टही त्या दुखावलेल्या व्यक्तीला समजून घेता येत नसते. त्याची मन:स्थितीच अशी असते की त्याला तर देवाचाही राग येतो. तो म्हणतो जेव्हा माझे सर्वस्व लुटले जात होते तेव्हा या जगातून कुणीही माझ्या मदतीला आले नाही आणि त्या वरच्या देवालाही माझी दया आली नाही! मग काय उपयोग तुमच्या सांत्वनाचा? ‘चार आँसू कोई रो दिया, फेरके मुँह कोई चल दिया. लुट रहा था किसीका जहां, देखती रह गई ये ज़मीं, चुप रहा बेरहम आसमां. ऐ मेरे दिल कहीं और चल...’

अशी गाणी मानसशास्त्रातला एक नियम पार पाडत असतात. दुसऱ्याचे पराकोटीचे दु:ख पाहून माणसाला जणू त्याच्याच दु:खाचे निवारण झाले असे वाटू लागते. मनाला हळुवारपणे आंजारून गोंजारून शांत करणारी अशी गाणी हा एक सार्वकालिक दिलासा असतो. प्रत्यक्षात जग जसे आहे तसेच राहणार असते आणि किमान समज असणाऱ्या माणसाला जीवन आहे तसेच स्वीकारून पुढे जावे लागते. यासाठी कविवर्य शकील बदायुनी यांनी ‘मदर इंडिया’त एक सुंदर गाणे दिले होते. लतादीदी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या त्या गाण्याचे अजरामर शब्द होते - ‘दुनियामे हम आये हैं तो जीनाही पडेगा, जीवन अगर जहर हैं तो पीनाही पडेगा!’

शोधले तर जुन्या अनेक गाण्यात असा खूप चांगला संदेश सापडतो पण हरी नारायण आपटे यांच्या १३५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या कादंबरीचे शीर्षकच होते ना -“पण लक्षात कोण घेतो?”

Comments
Add Comment